दोघात तिसरा, पालकमंत्री विसरा ! कोण होणार रायगडचा पालकमंत्री?

06 Jan 2025 12:20:15
 alibag
 
अलिबाग | रायगडच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे रहावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते, रायगडचे खासदार सुनील तटकरे आग्रही आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा, अशी गळ घातली आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आ.भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीमदे मिळाली आहेत. जिल्ह्यात तीन आमदार असूनही भाजपला यावेळीदेखील स्वतःसाठी येथे मंत्रीपद घेता आलेले नाही. असे असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या चढाओढीमुळे भाजप नेते नाराजी व्यक्त करत आहेत.
 
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्वीपासून वाद होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार आले आणि सुनील तटकरेंसोबत शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी जुळवून घेण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यात शिवसेनेचे तेव्हादेखील तीन आमदार होते. महाडचे आमदार भरत गोगावले तीन वेळा निवडून आले होते. त्यामुळे रायगडला अर्थात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा शिवसेना आमदारांना होती.
 
तसे त्यांनी बोलूनही दाखलवे मात्र तेव्हा त्यांचा नंबर मंत्रिमंडळात लागला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने अदिती तटकरेंनामंत्रीपद देऊ केले. त्यांच्याकडे अर्धा डझन राज्यमंत्री पदे देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार अस्वस्थ झाले होते. पुढे रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदारांच्या जखमेवर जणू मीठच चोळले होते. त्यामुळे तिन्ही आमदार प्रचंड संतापले होते.
 
त्यांनी अदिती यांना उघड विरोध करण्यास सुरुवात केली होती. ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे अडिच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले आणि उध्दव ठाकरे यांचे सरकार कोसळले. या बंडाच्या पायाचे दगड रायगडचे तिन्ही आमदार झाले होते. त्यांनी पालकमंत्रीपदाची भडास काढत शिंदे यांना साथ दिली होती.
 
भाजपच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले; मात्र येथेदेखील राष्ट्रवादीने शिवसेना आमदारांची पाठ सोडली नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाला आणि पुन्हा एकदा अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या. रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्याकडे जाणार, अशी चर्चा सुरु झाली. शिवसेनेच्या आमदारांनी विरोध दर्शवत, कसे तरी हे पद शिवसेनेकडे राखले आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत पालकमंत्री झाले.
 
तटकरेंपेक्षा सामंत यांच्यावर समाधान मानत शिवसेनेचे आमदार कामाला लागले. तोपर्यंत लोकसभा निवडणूक जवळ आली होती. खा. सुनील तटकरे यांनी आपली जादू त्यांच्या मतदारसंघातील आमदारांवर करण्यास सुरुवात केली. ते त्यात यशस्वीदेखील झाले. मोठ्या फरकाने निवडून आले आणि दिल्लीला रवाना झाले. यानंतर २०२४ ची विधानसभा निवडणूक झाली. महायुतीचे सरकार पुन्हा आले.
 
भरत गोगावले शिवसेनेकडून तर अदिती तटकरे राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री झाल्या. महायुती असूनही खा. सुनील तटकरे यांनी आपल्या पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेचे तिन्ही आमदार करत आहेत. पालकमंत्री पदावरुनही चढाओढ सुरु आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद गोगावले होणार की तटकरे? की या दोघांच्या भांडणात परत एकदा जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री रायगडला मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0