राज्याच्या निर्यातीत रायगडचा ९.३ टक्के वाटा , जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त उद्योजकांना उद्योजकता प्रशिक्षण

07 Jan 2025 16:23:16
 alibag
 
अलिबाग | निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे ५ लाख ५६ हजार कोटी एवढे योगदान आहे. त्यात रायगड जिल्ह्याचे ५१ हजार ७०० कोटींचे योगदान आहे. राज्याच्या निर्यातीत रायगड जिल्ह्याचा वाटा ९.३ टक्के आहे. ते प्रमाण वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी दिली. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सोमवारी (६ जानेवारी) जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित निर्यात प्रचालन कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
 
त्याप्रसंगी जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले कि , जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त उद्योजकांनी उद्योजकता प्रशिक्षण घेतले आहे. मरीन आणि फिशिंगसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. गणपती क्लस्टर व बांबू क्लस्टर या दोन महत्त्वाच्या योजनांवर जिल्ह्यात काम चालू आहे. पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पांढर्‍या कांद्याचे उत्पादन क्षेत्र पूर्वी २५० हेक्टर होते, ते यावेळी ५०० हेक्टरपर्यंत वाढवले आहे व पुढे १ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा मानस आहे.
 
alibag
 
बांबू क्लस्टरच्या माध्यमातून यावर्षी रोजगार हमी योजनेमध्ये एक कोटी बांबू रोपे तयार करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ म्हणाल्या की, असोसिएशन, उद्योजक यांच्यासोबत बँकर्स आणि शासकीय अधिकारी हे एकमेकांमध्ये समन्वय साधत चांगले काम करत आहे, चांगला प्रतिसाद देत आहेत. निर्यात क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
चालू वर्षामध्ये निर्यातीमधील जिल्ह्याचे योगदान वाढविण्याच्या दृष्टीने काम करु या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना इन्फ्रास्टक्चर, स्टँप ड्युटी, वीज बील आदी बाबींवर देण्यात येणार्‍या अनुदानाची माहिती त्यांनी दिली. उद्योजकांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणार्‍या विविध सुविधा, त्यांच्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, लीड बँकेचे महाव्यवस्थापक कुलकर्णी, संयुक्त संचालक जनरल ऑफ फॉरेन ट्रेड डिजीएफटी प्रवीण कुमार, मुख्य वित्त अधिकारीचे प्लेक्स कौन्सिल हर्षद साळवी, व्यवस्थापन कार्यकारी अधिकारी रिषू मिस्त्रा, उपसंचालक प्रादेशिक अधिकारी टी. आर. गिबिनकुमार, सीफूड इंडस्ट्रीज अधिकारी मनिषा कोळी आदी उपस्थित होते.
 
या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0