कर्जत येथे गुरे चोरुन नेणारे दोघे अटकेत, टेम्पो जप्त

07 Jan 2025 17:13:30
 KARJT
 
कर्जत | तालुक्यातील पिंपळपाडा गावाच्या बाजूकडून साळोख गावाकडे गुरे चोरुन कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या दोघांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. कर्जत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून ४ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
 
कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी लालासो तोरवे आणि राहुल जाधव हे ६ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या वाजता गस्त घालत असताना एक टेम्पो त्यांना संशयास्पद आढळला. हा टेम्पो कर्जत तालुक्यातील पिंपळपाडा बाजूकडून साळोख बाजूकडे जात असताना सुगवे गावाच्या हद्दीमध्ये पोलिसांनी तो अडवला.
 
टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गुरे आढळली. टेम्पोमध्ये एकूण सात गोवंश जातीची जनावरे आढळली ही गुरे चोरी करून साळोख गावाकडे घेऊन जाताना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टेम्पो जप्त करत कर्जत पोलीस ठाण्यात आणून गुरे चोरणार्‍यांवर कारवाई केली. याप्रकरणी अजय चंद्रकांत चवर व महेश अंकुश हीलम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेही साळोख येथे राहणारे आहेत.
 
तर दोन अज्ञात इसम फरार आहेत. ७ गोवंश जातीची जनावरे व टेम्पो असा एकूण ४ लाख २२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे. पुढील तपास कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लालासो तोरवे करीत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0