कोलाड | रोहा तालुयात खांब साई नगर येथील चालू विद्युत उपकरण ट्रान्सफॉर्मरवरील तांब्याच्या तारेची कॉईलच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गेले तीन दिवस साईनगर गाव हे अंधारात असल्याचे समजते. तर घटनेबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला जात असून, खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरु करण्यास संबंधित खात्याकडून टाळाटाळ होत असल्याने, अद्याप अंधराशी सामना करावा लागत आहे.
६ जानेवारी रोजी पहाटे सकाळी एक ते पाच वाजण्याच्या सुमरास ही घटना घडली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार आहे तरी कसा? याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्त वर्गातून व्यक्त केला जात आहे. तर चालू विद्युत उपकरण ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा खंडित करून चोरट्यांनी डिपीवरील तांब्याची कॉईल लंपास केल्याची घटना घडली. येथील ग्रामस्थ गेले तीन दिवस अंधारात असून त्यांना अद्याप वीजपुरवठा सुरू करण्यास संबंधित अधिकारी वर्ग तसेच विद्युत वितरण खाते दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती कोलाड विभागीय विद्युत वितरण खात्याचे कनिष्ठ अधिकारी सुरेश सोननीस यांनी कोलाड पोलिसांना दिली. तर माहिती मिळताच कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांनी आपल्या सहकार्यांसमवेत घटनस्थळी भेट देत घटनेची पाहणी केली.
कोलाड पोलिस प्रशासन यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार mtpl/msedcl/100/22/378 कोड क्र. ४१३५४५२ या क्रमांकाचे विद्युत रोहीत्र कोणतरी अज्ञात इसमांनी नट बोल्ट खोलून पोलवरुन खाली पाडून त्यामध्ये असणारे ऑईल सांडवूननुकसान करून रोहित्रातील वरील वर्णनाची व किमतीची कॉईल फिर्यादीचे संमतीशिवाय स्वतः चे आर्थिक फायद्याकरिता चोरून नेली असल्याची घटना सोमवारी पहाटे एक ते पाचच्या सुमारास घडली. यात तब्बल २६ हजार रुपये किंमतीचे विद्युत रोहित्रातील असून अंदाजे ४५ किलोग्रॅम वजनाची तांब्याची कॉईल असल्याचे सांगितले.