अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्यावतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भव्य सहकार दिंडी, शोभायात्रा आणि जिल्हा सहकार परिषद आयोजित करण्यात आली.सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक योगदान अधोरेखित करण्यात आले.
सहकार दिंडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर ही दिंडी महावीर चौक, बालाजी नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करत सरखेल कान्होजीआंग्रे समाधीपासून ठिकरूळ नाका, आदर्श सहकारी पतसंस्था मार्गे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचली.

या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, माजी अध्यक्ष सतीश पाटील,रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक परेश देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जिल्हा फेडरेशन अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, आदर्श सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, कै दत्ता पाटील क्रेडिट कोऑप पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, एकविरा पतसंस्था नवगाव अध्यक्ष प्रमोद घासे तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा तब्ब्ल १००० पेक्षा अधिकांनी उपस्थिती दर्शविली.
तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सहकार क्षेत्रातील तीन रंगांचे महत्व स्पष्ट केले. लाल रंग - सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व, निळा रंग - आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक, हिरवा रंग - पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक याच पोर्शभूमीवर सहकार शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सहकार दिंडीच्या सांगता समारंभात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या योगदानाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.
देशात जिल्हा बँक अग्रेसर म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सहकाराला दिशा देण्याचे काम बँक प्रभावीपणे करण्यास कटीबद्ध आहे असेही ते म्हणाले. सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकारी संस्थांनी एकत्र येऊन नव्या वाटचालीचा संकल्प सोडला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत करून बँकेमुळे भविष्यात सहकार चळवळीला आणखी बळकटी मिळेल, असा विेशास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.