देशातील पहिले कंटेनर थीम अ‍ॅक्वॅरिअम अलिबाग येथे होणार , आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

01 Feb 2025 13:24:53
alibag
 
अलिबाग | देशातील पहिले कंटेनर थीम भव्य मत्स्यालय अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर असलेल्या मैदानात होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च येणार असून पुढील आठ महिन्यांत हे मत्स्यालय कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे. रायगडच्या पर्यटनासाठी हा एक माईलस्टोन ठरेल, असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.
 
अलिबाग नगरपरिषदेच्या विशेष अनुदान योजनेंतर्गत अलिबाग समुद्र किनारी भव्य मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते प्रकल्पाचा भूमिपूजन शुक्रवारी (३१ जानेवारी) पार पडला. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. दुबईच्या धर्तीवर या कंटेनर थीम मत्स्यालयाची निर्मिती होणार आहे.
 
कंटेनर पध्दतीच्या या अभिनव मत्स्यालयात बोगद्याच्या आतून सागरी माशांचे विश्व अनुभवता येणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या ड्रिम पोजेक्टपैकी हा प्रकल्प एक असून यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन राज्य शासनाकडून ६० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या प्रकल्पात विविध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत. ४० फूट लांबीच्या मत्स्यालय टनेलचा यात समावेश असणार आहे.
 
याशिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे. फूड कोर्ट आणि कॅफेटेरीयाचाही या समावेश असणार आहे. आठ महिन्यांत मत्स्यालयाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. आगामी काळात अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास आ.दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी प्रास्ताविक मांडले. यावेळी अलिबागचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0