खुशबू मृत्यू प्रकरण...मृत्यूला काविळीचा रंग देण्याचा प्रयत्न?

10 Feb 2025 17:44:31
 KARJT
 
कर्जत | पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणार्‍या खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभाग आपली कातडी वाचविण्याच्या प्रयत्नात आहे, असा थेट आरोप पेण तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला आहे.
 
शासकीय अनास्थेचा बळी ठरलेल्या खुशबूचा मृत्यू कावीळमुळे झाल्याचा कांगावा आरोग्य विभाग करत आहे. खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांनी तिला कावीळ झालीच नव्हती, असे म्हणणे पुढे आले आहे. पेणमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर हे आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने महिन्यातून एक दोन वेळा नामदेव ठाकरे राहत असलेल्या बोरगाव ग्रामपंचायतमधील तांबडीमध्ये जात आहेत.
 
गेली अनेक वर्षे त्या डोंगरातील आदिवासी वाडीमधील वाड्यांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ठाकूर यांची संस्था आवाज उठवत आली आहे. त्याचवेळी दर तीन महिन्यांनी ठाकूर हे तांबडीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करीत आले आहेत. यामुळे आरोग्य संबंधित कार्य करणारे संतोष ठाकूर यांनी खुशबूच्या मृत्यूनंतर आता आरोग्य विभाग आपली कातडी वाचविण्यासाठी खुशबूला कावीळ झाला असल्याचा कांगावा करीत असल्याचा आरोप केला आहे.
 
त्याबाबत ठाकूर यांनी स्पष्टीकरण देताना कुष्ठरोग किंवा टिबी झालेल्या रुग्णांना सरकारी यंत्रणा औषधे देत असतात. ती औषधे घेतलेल्या संबंधित व्यक्तीची लघवी ही भडक पिवळी आणि लालसर होऊ लागते. त्या व्यक्तीने सतत तीन-चार महिने गोळ्या घेतल्यावर लघवी नेहमीसारखी होऊ लागते. मात्र चुकीची औषधे देणार्‍या आरोग्य विभागाने आता खुशबूला कावीळ झाली होती, असे निदान करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
 
चुकीच्या पद्धतीने कुष्ठरोगी ठरविल्याने आणि कुष्ठरोगाची औषधे दिली गेल्याने खुशबू हीची लघवी पिवळी होत होती, मात्र तिच्या अंगावर कावीळसारखे अन्य कोणतेही लक्षणे दिसत नव्हती असे पालक सांगत आहेत. मात्र कुष्ठरोगी ठरवल्यावर खुशबूची बायप्सी करण्याची गरज आरोग्य विभागाला का भासली नाही ? असा प्रश्न संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आपल्याला वाचविण्यासाठी खुशबूला कावीळ झाली होती, असा कांगावा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
नामदेव ठाकरे यांनी १६ डिसेंबर रोजी आपली मुलगी कुष्ठरोगी ठरते, १८ डिसेंबर रोजी तिला गोळ्या सुरू केल्या जातात आणि आम्हाला २९ डिसेंबर रोजी तिला ताप आल्यावर कळते, हा सर्व घोळ असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.दुसरीकडे ३ जानेवारी रोजी आम्ही तिला पुन्हा आश्रमशाळेत नेऊन सोडले. त्यानंतर आमची मुलगी शाळेतील एका कार्यक्रमात ३ जानेवारी ते १० जानेवारी या काळात तब्बल अर्धा तास नाचत होती.
 
मग आमची मुलगी कावीळग्रस्त होती असे आरोग्य विभाग कसे म्हणू शकते, असा प्रश्न नामदेव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्या काळात चुकीच्या औषधांनी अंगावर फोडी आल्या, अंग सुजू लागले. ही लक्षणे दिसू लागल्यावर १० जानेवारी रोजी शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयात नेवून तपासणी केली. त्यामुळे आमच्या मुलीला दिलेल्या चुकीच्या औषधांमुळे तिची लघवी पिवळी झाली आणि हाच पर्याय शोधून काढत आरोग्य विभाग आता आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप नामदेव ठाकरे यांनी केला आहे.
कुष्ठरोगासारख्या आजाराला वैद्यकीय अधिकार्‍यांनी फक्त संशयावरून औषधोपचार करणे हे चुकीचे आहे. औषध उपचारापूर्वी बायोप्सी करून आजार निश्चित करणे गरजेचे होते.आरोग्य विभागाच्या चुकीच्या उपचारामुळे फक्त खुशबूचाच जीव गेलेला नाही तर आधीच काही ना काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहणार्‍या ह्या आदिवासी समाजामध्ये पुन्हा एकदा शासकीय आश्रमशाळांच्या बाबतीत गैरसमज पसरून हा समाज पुन्हा एकदा शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचे सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. -संतोष ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते
Powered By Sangraha 9.0