उरण जासई पुलावर अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

11 Feb 2025 17:49:59
 uran
 
उरण | उरण तालुक्यातील जासई येथील उड्डाणपुलावर एका दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघात केल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने अपघात स्थळावरुन पलायन केले आहे. उरण कुंभारवाड येथे राहणारे अनिश नायर (वय २६) आणि बोरी येथे राहणारे अभिजीत भुवड (वय ३०) हे सोमवारी (१० फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घराकडे येत होते.
 
त्यांची गाडी जासई येथील उड्डाणपुलावर आली असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघात करणारी व्यक्ती अपघात करून पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. हा अपघात कसा झाला? कोणी केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, उरणमध्ये सुसज्ज असे एकही हॉस्पिटल नसल्याने अपघातग्रस्त व्यक्तींना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे सुसज्ज हॉस्पिटल व प्रत्येक चौकात पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी जनतेने केली आहे.
Powered By Sangraha 9.0