मे २०२४ मध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार ?

13 Feb 2025 17:58:08
KARJT
 
कर्जत | कर्जत तालुयात मे २०२४ मध्ये चक्रीवादळ आले होते. त्यावेळी तालुयातील अनेक गावांमधील घरांचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील एकाही नुकसानग्रस्ताला शासनाने मदत केलेली नाही. दरम्यान, मे २०२४ मध्ये नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई दिली नसल्याने आंबिवली गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांची भेट घेऊन मागणी केली. शासनाने दखल न घेतल्यास शेतकर्‍यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे.
 
१४ मे २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुयात सायंकाळी ५.०० च्या सुमारास चक्रीवादळ येऊन मोठ्या प्रमाणात गारांचा (गारपिटी) पाऊस पडला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वारे वाहत होते आणि त्यांचा फटका तालुयातील अनेक गावांना बसला. त्यावेळी वारा आणि पाण्याचा जोर इतका होता की ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावातील सुमारे ५० घरांचे नुकसान झाले होते. गावातील ५० टक्के घरावरील कौले व पत्रे उडून गेली होती.
 
तसेच घरातील फर्निचर आणि अन्न-धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे तत्कालीन तलाठी माणगांव तर्फे वरेडी यांच्यामार्फत नुकसानी बाबत पंचनामे करून तत्काळ पुढील कारवाई कामे तहसील कार्यालय यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने त्या पैकी एकाही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची काळजी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावू बसले आहेत.
 
परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबिवली गावातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाकडे आपण जातीने लक्ष देऊन नुकसानग्रस्तांसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना आदेशित करावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती.
 
परंतु अद्याप कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे आंबिवली गावातील नुकसानग्रस्त नागरिकांनी तहसील कार्यालय कर्जत गाठले व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे निवेदन पत्र देऊन करण्यात आली. यावेळी आंबिवली गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0