अलिबाग | जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहायक लिपीक नाना कोरडे याने १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेगवेगळ्या कर्मचार्यांच्या नावावर हे पैसे काढल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा घोटाळ्याची व्याप्ती ४ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पंचायतराज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचार्यांचा पगार देण्यात येतो.
पगार व कर्मचार्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत. याचा गैरफायदा नाना कोरडे याने घेतला. त्याने धनादेशांवर वरिष्ठ अधिकार्यांच्या बनावट सह्या केल्या आणि इतर कर्मचार्यांच्या खात्यात पगाराव्यतिरिक्त अन्यफरकाची रक्कम स्वतःच्या तसेच पत्नीच्या खात्यात वळती करुन घेतली आहे. मार्चअखेर आल्यामुळे जिल्हा परिषदेचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरु असताना, एका साधारण कर्मचार्याच्या खात्यावर सरकारी खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले.
याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना देण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाची तपासणी केली असता अवघ्या दीड वर्षांत १ कोटी १९ लाख रुपयांचा चुना नाना कोरडे या लिपीकाने सरकारला लावल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली.
या समितीने केलेल्या चौकशीत नाना कोरडे याने आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची धनादेशांवर बनावट सही करून, पगाराव्यतिरिक्त कर्मचार्यांना देण्यात येणारी रक्कम परस्पर रायगड जिल्हा बँकेतील स्वतःचे खात्यात वळती केली. तसेच काही रक्कम पत्नी सोनाली कोरडे हिच्या खात्यात वळती केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर रक्कम ही १ कोटी १९ लाख रुपये इतकी आहे.
नाना कोरडे हा पाणी पुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभागाच्याअलिबाग व म्हसळा प्रकल्प येथे २०२० पासून कार्यरत होता. याठिकाणीही त्याने असाच गैरव्यवहार केला असण्याची शक्यता आहे. याचीदेखील चौकशी नेमण्यात आलेली समिती करत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती साधारण ४ कोटींच्या वर असल्याची चर्चा आहे.
६८ लाख केले परत..!
आपले बिंग फुटले आहे हे लक्षात येताच नाना कोरडे याने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे पाय धरले आणि वाचवण्याची विनंती केली.
तसेच अफरातफर केल्याचे कबुल करत ६८ लाख रुपये जिल्हा परिषदेला परत केल्याची माहिती बास्टेवाड यांनी दिली आहे. दरम्यान, कोरडे याने केलेल्या घोटाळ्याचा तपास सुरु आहे. तो झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होईलच; परंतू त्यांच्याविरोधत गुन्हा देखील दाखल करण्यात येणार बास्टेवाड यांनी म्हटले आहे.