डेटिंग अ‍ॅपवर महिला असल्याचे भासवून तरुणाने व्यवसायिकाला ३३ लाखांना लुबाडले

15 Feb 2025 19:08:22
 new mumbai
 
नवी मुंबई | डेटिंग अ‍ॅपद्वारे महिला असल्याचे भासवून नवी मुंबईतील घणसोली येथे राहणार्‍या एका व्यावसायिकाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडून तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आले. नवी मुंबई सायबर पोलिसांनी सदर तरुणाला देहराडून येथून अटक केली आहे.
 
संजय कैलासचंद मिना (२४) असे या भामट्याचे नाव आहे. या उकळलेल्या पैशांतून त्याने महागडी कार विकत घेऊन वेगवेगळ्या राज्यांतील तरुणींवर पैसे उधळल्याचे तपासात आढळून आले आहे. पीडित व्यावसायिक घणसोली येथे राहण्यास आहे. मार्च २०२४ मध्ये या व्यावसायिकाने ‘बंम्बल’ नावाच्या डेटिंग अ‍ॅपवर सर्च केले होते.
 
त्यावेळी आरोपी संजय मिना या भामट्याने आपण प्रगती दहिया नावाची महिला असल्याचे भासवून ओळख केली. व्यावसायिकाशी मैत्री करत त्याच्याशी चॅटिंगद्वारे संवाद वाढवला होता. त्यानंतर मिना याने प्रेमाचे नाटक करुन त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच त्याने वेगवेगळी कौटुंबिक कारणे सांगून व्यावसायिकाकडून सहानुभूती मिळवित १० मार्च ते ३० जून या कालावधीत तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केली होती.
 
सुप्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना याची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित ड्रीमगर्ल या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आरोपीने व्यावसायिकाला फसवले. ऑगस्ट महिन्यामध्ये या व्यावसायिकाने नवी मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. सायबर पोलिसांनी देहराडूनयेथे जाऊन संजयला ताब्यात घेतले.
 
 
Powered By Sangraha 9.0