सिडकोच्या २६ हजार घरांची सोडत आता १९ फेबु्रवारीला होणार

17 Feb 2025 13:01:12
 panvel
 
नवी मुंबई | सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी (१९ फेब्रुवारी) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शनिवारी ही सोडत होणार असे सिडकोने जाहीर केले होते. सिडकोने २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवार (१५ फेब्रुवारी) निवडला होता.
 
या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवर पाठविले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली. मागील वर्षी (१२ ऑक्टोबर) दसर्‍यायाच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांसाठीची सोडत प्रक्रियेला सुरूवात केली. तब्बल १ लाख ६० हजार नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज भरले.
 
दरम्यान, सिडकोने आता शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी (१९ फेब्रुवारी) सोडतीची तारीख निश्चित केली असली तरी सोडत तळोजा वसाहतीमधील फेज १, येथील सेक्टर २८ येथील रायगड इस्टेट येथे होईल की सिडको भवनातील सभागृहात हे अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र बुधवारी सोडतीचे थेट प्रक्षेपणाचा अनुभव केंद्रांवर अर्जदारांना पाहता येईल.
 
Powered By Sangraha 9.0