कर्जत | कर्जत तालुक्यातील वडवली गावातील दोन कुटुंबातील किरकोळ वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. दोन्ही बाजूकडून ग्रामस्थदेखील सोबत होते. मात्र पोलीस स्टेशनसमोर जेव्हा हे दोन्ही कुटुंब समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत. कडावमधील विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते.
कैलास पवार यांनी गावातील एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता अडवला होता. हा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला, पण तोडगा निघाला नाही. १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता, कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास हरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली यावरून वाद सुरू झाला.
वैभव पवार याने विकास हरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला, यामध्ये विकास आणि त्यांचा भाचा हितेश घुडे जखमी झाले. या घटनेनंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास, विकास हरड, हितेश घुडे आणि काही ग्रामस्थ कर्जत पोलीस ठाण्यासमोर थांबले होते.यावेळी कैलास पवार आणि त्याच्या सहकार्यांनी तेथे येवून मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात रोशन मराडे यांच्या डाव्या हाताला, मोहन मराडे यांच्या डोक्याला आणि प्रथम मराडे यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दुसरीकडे कैलास पवार यानेही तक्रार दाखल केली आहे. गावातील रस्त्याच्या वादावरून त्यांना वारंवार धमक्या मिळत होत्या. १७ फेब्रुवारी रोजी आम्ही पोलिस ठाण्याकडे जात असताना, विकास हरड आणि त्यांच्या सहकार्यांनी पाठलाग केला आणि शासकीय भवनाजवळ त्यांच्यावर लाठाकाठ्यांनी हल्ला केला.
यामध्ये कैलास पवार याच्यासह त्यांची आई सुरेखा पवार, मनोज पवार आणि वैभव पवार जखमी झाले आहेत. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याचे तक्रारीत पवार याने म्हटले आहे. या प्रकरणात कर्जत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलिस तपास सुरू असून, परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना तातडीने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण घटनेने कर्जत शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिस ठाण्यासमोरच असे हल्ले होत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.