शासकीय कर्मचार्‍यांना आता स्वस्त रेशन धान्य नाहीच

19 Feb 2025 13:07:39
 new mumbai
 
नवीन पनवेल | शासकीय कर्मचारी, अधिकारी यापूर्वी केशरी कार्डद्वारे स्वस्त रेशन धान्याचा लाभ घेत होते, मात्र शासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या शासकीय कर्मचार्‍यांचे धान्य बंद करण्यात आले असून त्यांना पांढरे रेशन कार्ड देण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य पुरवत आहे.
 
पनवेल तालुक्यात १९९ स्वस्त धान्याची दुकाने असून त्यात द्वारे नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येतो. अनेक आदिवासी बांधवांना, गोरगरिबांना त्याचा लाभ होतो. केशरी (प्राधान्य) कार्ड धारकाला प्रति माणसी पाच किलो धान्य दिले जाते. तर अंत्योदय कार्ड धारकाला ३५ किलो धान्य दिले जाते. बर्‍याचदा अपुर्‍या माहितीमुळे लोकांना त्यांच्या रेशनकार्डवर मिळणार्‍या धान्याविषयी माहिती नसते, त्यामुळे बर्‍याचदा काही दुकानदार लोकांना त्यांच्या वाट्याचे धान्य देत नाहीत आणि लोकांची फसवणूक करतात.
७८ हजार रेशनकार्डधारक
पनवेल तालुक्यात ७८ हजार ६६९ प्राधान्य आणि अंत्योदय कार्ड धारक आहेत. यापैकी ७२ हजार ६० प्राधान्य कार्ड धारक तर ६ हजार ६०९ अंत्योदय कार्ड धारक आहेत.
वर्षभरात २४३ जणांचे रेशन कार्ड रद्द
पनवेल तालुक्यात शासकीय कर्मचारी देखील केशरी (प्राधान्य) मोफत रेशन कार्डद्वारे धान्याचा लाभ घेत होते. २०२४ मध्ये २४३ जणांचे केशरी कार्ड हे पांढरे करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यानुसार त्यांचे धान्य बंद झाले.
रेशन कार्ड कधी उपलब्ध होणार
पनवेल तालुक्यातील बहुतांशी रेशन कार्ड नाव कमी करणे किंवा विभक्त करण्यासाठी जमा करण्यात आलेले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांना रेशनिंग कार्ड मिळाले नाही आणि त्यांना धान्य देखील मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.
...तर रेशन कार्ड होणार रद्द
सलग तीन महिने लाभार्थ्यांनी रेशनिंग धान्य घेतले नाही तर त्याचे रेशन कार्ड रद्द होते. किंवा एखाद्याने उत्पन्नाची चुकीची माहिती दिलेली असल्यास आणि याबाबत पुरवठा विभागाला तक्रार केल्यानंतर त्यांचे धान्य बंद करण्यात येते.
तक्रार वहीबाबत रेशन दुकानदार अनभिज्ञ
पनवेल तालुक्यातील बहुतांशी रेशनिंग दुकानात तक्रार वही उपलब्ध नाही. लाभार्थ्याला तक्रार करावयाची असल्यास ती कुठे करायची हे समजत नसल्याने पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0