उरण | उरण मतदारसंघातील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आमसभा अखेर २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे जनतेच्या प्रतीक्षेत असलेल्या समस्यांवर चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पाच वर्षांत एकही आमसभा नाही!
१८ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेनंतर कोरोनामुळे पुढील सभा झालीच नाही. त्यानंतर संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ आमसभा न घेताच संपला. याचा फायदा घेत शासकीय अधिकारीवर्गाने आपल्या मनमानी कारभाराला व भ्रष्टाचाराला उत दिला, असा आरोप जनतेकडून होत आहे.
या आमसभेत तालुक्यातील प्रमुख प्रश्नांवर ठोस चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज रुग्णालयाची गरज, वाहतूक कोंडी, वाढते अपघात, बेरोजगारी आणि अनधिकृत बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड आणि अतिक्रमण, नादुरुस्त रस्ते आणि विजेचा लपंडाव, पाणीटंचाई आणि फेरीवाल्यांचा विळखा, शासकीय कार्यालयांतील कामांमध्ये भ्रष्टाचार आणि चिरीमिरीशिवाय कामे न होणे आदी महत्त्वांच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.
गेल्या अनेक आमसभांमध्ये जनतेच्या समस्यांवर अधिकार्यांकडून ठोस उपाययोजना झाल्याचे दिसले नाही. मुख्य अधिकारी गैरहजर राहतात आणि दुय्यम अधिकारी वेळ मारून नेतात. महत्त्वाच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा न होता केवळ औपचारिकता म्हणून सभा पार पडते. यंदाच्या आमसभेसाठी प्रत्येक शासकीय विभागाचा जबाबदार अधिकारी हजर राहील, याची सक्ती करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
पाच वर्षांनंतर २८ फेब्रुवारी रोजी होणारी २०२५ मधील ही पहिली आमसभा असून, उरणकरांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित समस्यांचे निवारण यावेळी होते की पुन्हा फक्त चर्चाच होते? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. हीआमसभा याआधीच्या सभांप्रमाणे केवळ वेळ मारून नेणारी ठरणार, की अधिकारी खरोखर जबाबदारीने काम करणार? जनतेच्या समस्यांवर ठोस निर्णय घेतले जातात की नाही, यावरच उरणकरांची पुढील दिशा ठरणार आहे.