खोपोली | खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ आणि चोरीला गेलेले १७ मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले आहेत. बहुतांश चोरीला गेलेले मोबाईल हे परराज्यात आणि काही जिल्ह्यांमध्ये अॅटिव्ह होते. मोबाईलपैकी काही मोबाईल हे ज्या व्यक्तींना विकले गेले, त्यांच्याशी संपर्क साधून कायद्याचा धाक दाखवून परत आणण्यात पोलिसांना यश आले. मोबाइल चोरीबाबत कारवाई करीत मोबाईल मूळ मालकांना परत मिळवून दिल्याबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे.
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक-दोन वर्षापासून गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारीचा नव्याने आढावा घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आदेश दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पो.कॉ. ए.एच. राठोड यांच्या पथकाने खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या १७ मोबाईल फोन्सचा सीआयइआर या मोबाईल ट्रेस अॅप्लीकेशनच्या माध्यमातून शोध सुरु केला. या मोहिमेमध्ये नमूद गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले.
पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सपैकी परराज्य आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे १७ मोबाईल फोन्स परत मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झालेले आहे. याप्रसंगी सहाय्यक पालीस निरीक्षक सुजित गडदे, उपपोलीस निरीक्षक अभिजित व्हरांबले, पो.ना. सागर शेवते, उपस्थित होते.
खोपोली शहरात दीड लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे.एसप्रेस, रेल्वे स्थानक, बाजारपेठेतून तसेच कॉलेज तरूणांचे प्रवासात मोबाईल चोरी किंवा गहाळ होण्याच्या घटना घडत आहेत. मागच्यावेळी जवळपास २०० मोबाईल परत आहे. आजही १७ मोबाईल परत केले आहेत यासाठी पोलीस प्रचंड मेहनत घेत आहेत. - शीतल राऊत पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे