बाजारात सुट्ट्या पैशांची कमतरता , व्यावसायिकांसह, ग्राहकांची गैरसोय

20 Feb 2025 19:57:37
 roha
 
कोलाड | डिजिटल करन्सीच्या युगात आता सुट्टे पैसे मिळणे कठीण झाले आहे. यामुळे बाजापेठेतील छोट्या, मोठ्या व्यावसायिक यांना सुट्टे पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यासह ग्राहकांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक वेळा आपण बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जातो. यावेळी आपण दुकानदाराला ५०० रुपयाची नोट देतो.
 
तो देखील सुट्ट्या पैशांची मागणी करतो. एसटी बस, रिक्षा, मिनीडोअर व इतर प्रवाशी वाहने सुट्ट्या पैशांची मागणी करीत असतात. परंतु आधुनिक काळातील डिजिटल युगात आपण जी-पे, कार्ड मनी आपण सहजपणे वापरत असतो. पण यामुळे सुट्ट्या पैशांची कमतरता निर्माण होतांना दिसत आहे. अनेकदा दुकानदारांना देण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात. काही वेळा तर सुट्टे पैसे नसल्याने घेतलेली एखादी वस्तू परत द्यावी लागते.
 
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ५०० रुपयांच्या शिवाय नोटा निघत नाही. ही नोट वस्तू खरेदीसाठी बाजारात घेऊन गेले असता बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने काही वेळा वस्तू खरेदी करू शकत नाही. स्पर्धेच्या युगात छोटे दुकानदार, पानपट्टीधारक तसेच वडापाव व्यावसायिकांना दोन-तीन रुपयांवर व्यवसाय करावा लागत आहे.
 
यामुळे सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होतांना दिसत आहे. यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन रिझर्व्ह बँकेकडे सुट्टी पैसे बाजारात उपलब्ध करण्यासाठी मागणी करणे गरजेचे झाले आहे. लवकरच लवकर बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध व्हावे, अशी मागणी व्यावसायिकांसह ग्राहक वर्गातून केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0