पेण | गेल कंपनीच्या पाईपलाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी पेण उपविभागीय कार्यालयासमोर २० फेबु्रवारी रोजी बाधित शेतकरी उपोषणास बसणार आहेत. तसे लेखी निवेदन दिले असल्याची माहिती २४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच काशिनाथ पाटील यांनी दिली.
गेल कंपनीची पाईपलाईन ही पेण तालुयातील रावे, कोपर, डावरे, हनुमानपाडा, जोहे, कळवे, कणे, बोझें, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावातील शेतकर्यांच्या सुपीक शेतजमिनीतून जात आहे. या पाईपलाईनसाठी पेण तालुयांतील १३ गावांतील अनेक शेतकर्यांची जमीन संपादीत होणार आहे. हे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत.या सुपीक शेतजमिनी शेतकर्यांच्या कुटुंबाचे जीवनधारणेचे साधन आहे.
मात्र पाईपलाईनच्या संपादनामुळे वरील सर्व गावातील शेतकर्यांचे अपरिमित कधीही भरून न निघणारे प्रचंड नुकसान होणार आहे. या गॅस लाईनमुळे हमरापूर विभाग, वाशी विभाग, वडखळ विभाग पूर्णतः उद्ध्वस्त होऊन पाईपलाईनलगतच्या परिसरातील नागरिकांचा, रहिवाशांचा सुरक्षिततेचा व जीविताचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या भूसंपादनासाठीच्या प्रक्रियेला शेतकर्यांचा पूर्णपणे विरोध आहे.
तसे वेळोवेळी शेतकर्यांनी संबंधितांना कळविलेले असल्याचे काशिनाथ पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. गेल कंपनीच्या पाईप लाईन्ससाठी संपादनाकरिता यापूर्वी उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (महाराष्ट्र राज्य) गेल इंडिया लिमिटेड, सी.बी.डी. बेलापूर यांनी भारत सरकारचे राजपत्र भाग २ खंड ३ उपखंड (खख) (ता. १८ नोव्हेंबर २०२५) मधील जाहीरनामा प्रसिद्ध करणे, सबंधित शेतकर्यांना ३ (१) च्या नोटीसा व सुनावणीच्या नोटीस बजावणे, शेतकर्यांच्या प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम पूर्ण झाले असून संपादनाच्या प्रत्येक पायरीवर संबंधित शेतकर्यांनी आतापर्यंत या सर्व प्रक्रियांना शांततेच्या मार्गाने संपादनास रितसर लेखी व तोंडी विरोध नोंदवून वेळोवेळी हरकती घेतल्या आहेत.
तरीही जबरदस्तीने हा प्रकल्प शेतकर्यांच्या माथी मारला जात आहे, म्हणून गेल कंपनीच्या पाईप लाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर २० फेबु्रवारी रोजी बाधित शेतकरी उपोषणास बसणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.