१९,५१८ नागरिकांचे सिडकोच्या घराचे स्वप्न पूर्ण , २१ हजार ३९९ सदनिकांची महासोडत

21 Feb 2025 17:37:29
mumbai
 
मुंबई | सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था काम करत आहेत. बुधवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ सदनिकांची महासोडत काढण्यात आली. यातून १९ हजार ५१८ नागरिकांचे सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या योजनेद्वारे हे स्वप्न पूर्ण होत आहे.
 
त्यामुळे हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असल्याचे सांगत, या लाभार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.एका क्लिकवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १९ हजार ५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न बुधवारी पूर्ण झाले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली.
 
याप्रसंगी सिडकाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.अँड टी., शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. आता अटल सेतूमुळे २० मिनिटांत प्रवास होतो. ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सडकोच्या योजनेमुळे सर्वसामान्यांना हक्काचे घर-मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओद्वारे संदेश प्रसारित केला. या संदेशामध्ये मुख्यमंत्र्यांनी सिडकोची गृहनिर्माण योजना हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा दिल्या.
 
नवी मुंबई हे भविष्यातील विकासाचे केंद्र असून सिडकोच्या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबांना नवी मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले असल्याचे मुख्यमंत्री यांनी या संदेशाद्वारे सांगितले.
‘एमटीएचएल’मुळे फ्लेमिंगोची संख्या वाढली!
एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली.
 
यावरुन हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरणे आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणार्‍या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0