प्रलंबित मागण्यांकरिता...केंद्र शासन, पोस्ट विभागाचा काळ्या फिती लावून निषेध

21 Feb 2025 17:04:04
 Murud
 
मुरुड जंजिरा | पीजेसीए नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार १८ व १९ फेब्रुवारी रोजी प्रलंबित मागण्यांकरिता काळ्या फिती लावून केंद्र शासन व पोस्ट विभागाचा निषेध करण्यात आला. गेले अनेक वर्षे प्रलंबित असणार्‍या मागण्या जुनी पेन्शन, ग्रामीण डाक सेवकांना आठ तास ड्युटी, आठवे वेतन आयोगात समाविष्ट करून घेणे, पोस्ट विभागाचे विविध मार्गाने होणारे खाजगीकरण थांबवणे व इतर मागण्यांसाठी काळी पट्टी लावून मुरुड येथील ग्रामीण डाकसेवक व उपशाखा डाकघर येथील मुरुड तालुयातील सर्व ४५ कर्मचार्‍यांनी निषेध नोंदवला आहे.
 
यावेळी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष दिनेश शहापूरकर, उपसचिव एनएफपीई रायगड विभाग कौस्तुभ काटकर, एनएफपीई पोस्टमन संघटनेचे अध्यक्ष संतोष चिपळूणकर, पोस्ट मास्टर मुरुड दीपक घाटवळ, सुनील सतविडकर, मुश्ताक अपराध, सुधीर दांडेकर, सुधीर भाटकर, मधुकर कुर्डुसे, नीरज चव्हाण, विमल कुमार, पिंकी सुथार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
आखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष दिनेश शहापूरकर यांनी सांगितले की, जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आमचे पुढील आंदोलन जंतर मंतर, नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0