कर्जत | तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायतीमधील शेतकर्यांना जमिनी देण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. शेतकरी पोलिसांना त्याबाबत तक्रारी देत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करीत दोन महिने हे सुरू असल्याने अखेर माजी आमदार सुरेश लाड कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचले. सुरेश लाड यांनी गुरुवारी पोलीस अधिकार्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात न जाता कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरू केले.
तालुक्यातील पळसदरी शेतकर्यांच्या जमिनी कोणत्याही खासगी गृहनिर्माण प्रकल्प यास देण्यात विरोध केला आहे. मात्र तेथे आलेल्या बांधकाम कंपनीकडून जमिनीचे कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकर्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू आहे. तसेच शेतकर्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकणे आणि धमकावणे जाण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबाबत स्थानिक शेतकर्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन बिल्डरकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कार्यवाहीबद्दल आणि धमकावणे याबद्दल तक्रार दिल्या आहेत.
मागील दोन-तीन महिने हा प्रकार सुरू असून शेतकर्यांच्या तक्रारी कर्जत पोलीस ऐकून घेत नसल्याने शेतकर्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्याकडे आपल्या तक्रारी केल्या. त्यानंतर लाड यांनी अलिबाग येथे जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, लेखी निवेदने दिली. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी माजी आमदार सुरेश लाड हे कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचले.
त्यांनी सकाळी अकरा वाजता थेट पोलीस ठाण्याच्या पायरीवर वृत्तपत्र अंथरुण आंदोलन सुरू केले. सुरेश लाड हे चक्क त्या ठिकाणी जमिनीवर टाकलेल्या पेपर्सवर झोपले आणि त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे. त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप लाड यांनी केला आहे.
त्यामुळे या अन्यायाविरोधात ते ठाण्याच्या बाहेरच आंदोलनास बसले आहेत. या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते, शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डी डी टेले हेही ठिकाणी माजी आमदार सुरेश लाड यांची समजूत काढू लागले. मात्र सहा, सात तास सुरेश लाड हे तेथे झोपूनच राहिले आहेत.
‘जिल्हा पोलीस अधीक्षक आल्याशिवाय उठणार नाही’ अशी भूमिक
शेतकर्यांचे ऐकून न घेणार्या पोलीस अधिकार्यांशी आपल्याला बोलायचे नसून जिल्हा पोलीस अधीक्षक कर्जत येथे ज्यावेळी येतील त्यावेळी आपण उठणार, असे जाहीर केले आहे. तर दुपारी साडेचार वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे कर्जत येथे पोहचले.
त्यांनी सुरेश लाड यांच्याशी चर्चा करून पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्यांची बैठक घेण्यास सुरुवात केली. मात्र तब्बल दीड तासांपासून सुरू असलेली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांची बैठक सुरूच होती.
कल्पतरू प्रकल्पातील शेतकर्यांवर दबाव...
पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे.कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी.
तसेच, शेतकर्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे. विशेषतः पांडुरंग शिर्के (मु. वर्णे) या शेतकर्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे. शेतकर्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.