रायगड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर , ऑनलाईन चक्री जुगारावर पोलिसांच्या धाडी

22 Feb 2025 12:54:17
alibag
 
अलिबाग | बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ‘चक्री’ या ऑनलाईन जुगाराविरोधात रायगड पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. गुरुवारी (२० फेब्रुवारी) रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अलिबागसह जिल्ह्याच्या विविध भागात धाडी टाकल्या. या कारवाईत ६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडील ८४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
जल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणात ‘गेम किंग चक्री’ या ऑनलाईन जुगाराच्या चक्रीत अडकत जात असल्याचे वृत्त ‘रायगड टाइम्स’ने दिले होते. गोरगरीब तरुण या आमिषाला बळी पडत आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. रोह्यातील एक उदाहरणदेखील ‘रायगड टाइम्स’ने ठळकपणे दाखवून दिले होते. यानंतर दोनच दिवसांत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक भूमिका घेतली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टिम कामाला लागली आहे.
 
३ अधिकारी आणि १५ अंमलदार यांची चार पथके तयार करण्यात आली आहे. गुरुवारी या पथकांनी अलिबाग शहर, पेण, रसायनी, रोहा, नागोठणे या ठिकाणी अवैध ऑनलाईन जुगारावर कारवाई केली. अलिबाग शहरातील कोहीनूर कॉम्प्लेक्स येथे एका दुकानामध्ये ऑनलाईन पध्दतीने जुगार खेळणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये अवैध जुगार व्यवहार चालविणारे कुणाल दत्तात्रेय सुर्वे (वय ३८ वर्षे, रा. मुरुड), राजेश मोतीलाल निशाद (वय ३० वर्षे, रा. अलिबाग) आणि शिल्पेश पोवले (रा. मु. अलिबाग) या तिघांविरुद्ध जुगार अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
त्यांच्याकडून दोन संगणक व रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई रसायनी येथे करण्यात आली. मातोश्री बिल्डींग, मोहपाडा वासांबे गाव याठिकाणी अवैध ऑनलाईन जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी सतिश लक्ष्मण शेजुळ (वय २९ वर्षे, रा. रसायनी), श्रीकांत पांगत (रा. रसायनी) आणि शिल्पेश पोवले (रा. मु. अलिबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
या कारवाईत ३ संगणक व रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, सचिन शेलार, परेश म्हात्रे, विकास खैरनार, भाग्यश्री पाटील, महीला पोलीस अंमलदार अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, अभियंता मोकल, झुलिता भोईर, तुषार कवळे, अक्षय जगताप सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0