अलिबाग | माणगांव तालुक्यातील कुंभे जवळच्या चन्नाट परिसरात उत्साही ब्लॉगर व पर्यटकांच्या वावरामुळे पशू-पक्ष्यांचे हाल होताना दिसत आहेत. अत्यंत धोकादायक अशा येथील कुंडामध्ये पोहण्यासाठी हे पर्यटक येत असतात, परिणामी स्वतःचे तर जीव धोक्यात घालतातच, वन्यजीवांचेही पाण्याविना हाल होतात.
सिक्रेट पॉइंटच्या वेडापायी उन्हाळ्यात या परिसरात येण्याचे पर्यटकांनी टाळावे, असे आवाहन स्थानिक तरुणांनी केले आहे. तर स्थानिक प्रशासनानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी केली आहे.पुणे आणि मुंबईसारख्या शहरातील काही पर्यटन करणार्या समूहांनी परिसराची पूर्ण माहिती नसताना धोके पत्करुन विनापरवाना या भागात टूर्स म्हणजे सहली चालू केल्या आहेत.
समाज माध्यमांवरुन रीलसोबत त्याच्या जाहिराती देण्यात येतात, लाखो व्ह्यूज मिळून समाजमाध्यमांवरून रील व्हायरल होत असल्याकारणाने जीवाची पर्वा न करता पुन्हा एकदा हा धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. एखाद्या पर्यटकाचा पुन्हा एकदा येथे जीव जाण्यापूर्वीच तातडीने याला आवर घालणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे आजूबाजूला वणवे लागत आहेत. उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे.
अशावेळी उन्हा तान्हातून वन्यजीव या कुंडांमध्येच पाणी पिण्यासाठी येत असतो. मात्र आता प्राणी आणि पक्षांचे अधिवासात पर्यटकांचा दिवसभर राबता राहिल्यामुळे वन्य प्राण्यांना उपद्रव होतो. पाण्याविना त्यांचे हाल होत आहेत त्यामुळे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांच्यासह स्थानिक तरुणांनी पर्यटकांना या परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. माणगाव तालुक्यातील कुंभे चन्नाट परिसर अतिशय निसर्गमय आहे.
पर्यटकांना या परिसराची भुरळ पडावी असाच हा परिसर आहे. त्यामुळे स्थानिकदेखील सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत येथे पर्यटन करतात, बाकीच्या दिवसांमध्ये सदरचा परिसर वन्य प्राणी आणि पक्षांसाठी राखलेला असतो. चन्नाट गावचे युवक अनिकेत कुळे, बाबु मांडवकर, दिपेश थोरे, रोहित भोसले, अमर थोरे, विपुल भोसले, सुनिल दिवळे व करंबेली ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर धाडवे यासाठी प्रयत्न करत असतात.
वनसंपदेला व वन्यप्राणीपक्षांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण करू देणार नाही, असे चन्नाटच्या युवकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात व पावसानंतर चार महिन्यात सर्वत्र मुबलक पाणीपुरवठा असलेल्या परिस्थितीत सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही येथे शाश्वत पर्यटन करवतो परंतु पर्यटकांनी आता उन्हाळ्यात येथे येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पशु-पक्षांसाठी धोका...
डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून फक्त या कुंडांमध्येच पाणी शिल्लक राहते. येथील वनपरिसरातील प्राणी व पक्ष्यांसाठी ही कुंडेच एकमेव जीवनदायी पाण्याचे स्रोत आहेत. प्रचंड जंगल परिसरातील प्राणी व पक्षी आपली तहान येथेच भागवतात. परंतु पर्यटकांचा वावर सुरू झाल्यामुळे प्राणी व पक्ष्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.