नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सुधारित आणि २०२५-२०२६ चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी मंजूर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.१६८६.०६ कोटी व जमा ३४०३.८२ कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु.५०८९.८८ कोटी आणि रु.३७८८.८४ कोटी खर्चाचे सन २०२४-२५ चे सुधारित अंदाज आयुक्तांनी सादर केले. तसेच रु. १३०१.०४ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.५७०९.९५ कोटी जमा व रु.५६८४.९५ कोटी खर्चाचे आणि २५ कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे २०२५-२०२६ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर व उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व मंजूर करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे व नयना ससाणे यांनी आयुक्तांकडे सादर केले व तेही मंजूर करण्यात आले.
नवी मुंबईचा या दृष्टीने विकास होत असताना वित्तीय सुधारणा, विकास केंद्र-रोजगार निर्माण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुलभ वाहतूक, आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण, शाश्वत जल व्यवस्थापन, सुप्रशासन, माझी वसुंधराप र्यावरण, नियोजित शहर-पायाभूत सुविधेचा विकास या महत्वाच्या बाबी असून, त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
वित्तीय सुधारणा
वित्तीय सुधारणा करण्यासाठी उत्पन्न वाढीकरिता विशेष कार्यबलाची नियुक्ती, करवसूलीकरिता कडक कार्यवाहीचे धोरण, गतीमान व प्रभावी वसूलीकरिता स्वतंत्र संस्थेची नियुक्ती, व्यावसायिक मालमत्तेचे सर्वेक्षण, जाहीरात गॅन्ट्री व डिजिटल होर्डिंग माध्यमातून उत्पन्न वाढ, कार्यालय, व्यावसायिक दुकानगाळे भाडे, निधी उभारणे, दायित्व मर्यादेत ठेवणे, जमा व खर्च याकरिता कॅशफ्लो पध्दतीचा अवलंब व ई.आर.पी. म्हणजेच सर्व विभागांची जमा-खर्चाची माहिती अद्ययावत व वास्तविक वेळेत होण्याच्या दृष्टीने नवीन ईआरपीची अंमलबजावणी पूर्णपणे नवीन आर्थिक वर्षापासून करण्यात येईल.
गुणवत्तापूर्ण शिक्षण
नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळा ह्या उत्तम दर्जाच्या आहेत. त्यासोबतच नंबर एकच्या शहराला साजेशी गुणवत्तावाढ नियमीतपणे करणे आवश्यक आहे. त्याकरिता, वैज्ञानिक दृष्टीकोन विकास, कॉम्प्युटर लॅब, सायन्स पार्क, सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण, डि.बी.टी. ऐवजी गणवेश व शालेय साहित्याचे महापालिकेमार्फत वितरण, अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण, राष्ट्रीय छात्र सेना यासाठी तरतूद करताना, शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेला आहे.
आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण
आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करताना, एम.आर. आय., केमोथेरपी, डायलिसीस, कॅथलॅब व आय. सी.यू विभाग कार्यान्वित करणे, पोषण पुनर्वसन केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र, नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर वैद्यकीय संस्था, आयुष रुग्णालय, नर्सींग कॉलेज, पशू वैद्यकीय दवाखाना, एन.ए.बी.एच. प्रमाणपत्र, अत्याधुनिक शवागृह, सी.एस.एस.डी. विभागाचे अत्याधुनिकीकरण यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
समाजविकास
नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, दुर्बल घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचाही सहभाग असला पाहिजे. ही बाब विचारात घेऊन त्यांच्याकरिता महिला बचत गटांचे सशक्तीकरण व बालभवन निर्मिती, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, नोकरदार महिलांकरिता वसतिगृह, विधवा-निराधार घटकांकरिता योजना, आदिवासी घटकांकरिता कल्याणकारी योजन, ज्येष्ठ नागरिक कल्याण केंद्राचे बळकटीकरण, दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, हर घर संविधान, नवीन ग्रंथालय तयार करणे, दिव्यांग सर्वेक्षण, नवीन ईटीसी सेंटर उभारणे, ईटीसी केंद्रात संगणक लॅब उभारणे, संक्रमण शिबीर, अकृषि उत्पादनासाठी ३० टक्के गाळे आरक्षित ठेवणे, कामगार कल्याण, तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्तींकरीता प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र उभारणे या योजना राबविण्यात येत आहे.
पर्यटनस्थळ विकास
नागरिकांचे मनोरंजन व पर्यटन याकरिता शहरामध्ये आवश्यक प्रमाणात व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरामध्ये सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंडर्स पार्क, विष्णुदास भावे नाट्यगृह अशी महत्वाची प्रेक्षणीय मनोरंजन, पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन स्थळ विकास अंतर्गत शहर पर्यटन धोरण, मरीना, मॅनग्रोव्ह पार्क, संग्रहालय, मत्स्यालय, गवळीदेव-सुलाईदेवी पर्यटन स्थळ, खुला रंगमंच, ऐरोली नाट्यगृह, बोटॅनिकल गार्डन विकसित करणे, फुलपाखरु उद्यान असे विशेष प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
माझी वसुंधरा
दरवर्षी हरितक्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हरितक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नवीन वृक्षांची लागवड करणे, बांबू लागवड, उद्यानांमधील सुविधा, नवीन उद्यान निर्मिती व उद्यान सुधारणा यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छ पर्यावरणाच्या अनुषंगाने पर्यावरण सुधारणा कृती आराखडा, हवा शुध्दीकरण यंत्र, इलेक्ट्रीक वाहन, प्रदूषण नियंत्रण यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
सौरऊर्जा
महानगरपालिकेच्या विविध इमारती, पथदिवे व इतर विविध प्रकल्प यांच्याकरिता विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे सौरविद्युत प्रकल्प उभारल्यास विद्युत खर्च कमी होणार आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरंगता सौर विद्युत प्रकल्प, महानगरपालिका इमारती, शाळा व दवाखाने याठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा याकरिता विशेष तरतूद करण्यात आली आहे.
सुलभ वाहतूक :-
शहर विकासामध्ये चांगली सार्वजनिक परिवहन व्यवस्था हा एक मुख्य घटक आहे. परिवहन व्यवस्था चांगली असेल तर वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच नागरिकांना वाजवी दरामध्ये प्रवास करता येतो. ही बाब विचारात घेवून परिवहन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. याकरिता अर्थसंकल्पात रक्कम रु.२७० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. यासह शाश्वत जल व्यवस्थापन, वैकुंठधाम विकास, घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता, क्रीडा सुविधा विकास, सुप्रशासन, अग्निसुरक्षा, प्रशासकीय सुधारणेसह शहर विकासासाठी विशेष तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.