पेण | पेण तालुक्यातील दादर गावातील तरुणाला टेम्पोने जोरदार धकड दिल्याने, तर डावरे गावातील तरुण हमरापूर येथे मोटारसायकलवरुन घसरून तसेच कांदळेपाडा येथील तरुण रेल्वेखाली आल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ३ तरुण जागीच ठार झाले. सदर अपघातांमुळे पेण तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.
सदर अपघातांची सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दादर गावातील हरेश धनाजी पाटील (वय २०, रा.दादर, ता.पेण) हा तरुण पोलीस भरती परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी गावाबाहेरील स्वामी परमानंद मठाकडे पायी चालत जात असताना ०६ ४०९२ क्रमांकाच्या थ्रीव्हीलर टेम्पोने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला मागील बाजूस जबर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुपारी हमरापूर गाव येथील मोरीवर डावरे गावातील विवेक विष्णूदास घरत (वय ३८ रा.डावरे, ता.पेण) हा मोटारसायकलवरून जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला स्लिप होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तिसर्या अपघातात रामवाडी रेल्वे ट्रॅकवर कांदळेपाडा गावातील तरुण निरंजन बाबुराव पाटील (वय २३) हा रेल्वे खाली आल्याने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला. सदर घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.