१४ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

27 Feb 2025 16:44:42
 khopoli
 
खोपोली | खालापूर तालुक्यातील इमॅजिका पार्क येथे सहलीसाठी आलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आयुष धर्मेंद्र सिंग असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी मुंबईतील घणसोली येथून आला होता. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले होते.
 
२५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा क्रमांक ७६ घणसोली येथे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल इमॅजिका पार्क येथे आली होती. या सहलीत आठवीत शिकणारा विद्यार्थी आयुष धर्मेंद्र सिंग याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो बेंचवर बसला आणि तेथेच जमिनीवर कोसळला. इमॅजिका थिम पार्कचे कर्मचारी व शिक्षकांनी आयुषला तात्काळ इमॅजिकामधील प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले.
 
तेथून पुढे त्यास खोपोलीतील पार्वती हॉस्पिटल येथे कार्डियाक ऍम्बुलन्समधून नेण्यात आले. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत शवविच्छेदन केले असून हृदयविकाराच्या झटक्याने सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला असल्याचे निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0