नवी मुंबई | नवी मुंबई येथे निर्माण करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन एप्रिल २०२५ मध्ये होईल तर, विमानसेवा मे पासून सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे २०२९ पर्यंत मुंबईचे -१ टर्मिनल बंद राहणार आहे.
यामुळे मुंबई विमानतळावरुन प्रवास करणार्यांसाठी नवी मुंबई विमानतळ हा पर्याय उपलब्ध होणार आहे विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक ब्युरो (बीसीएएस) प्रादेशिक संचालक प्रकाश निकम यांच्यासह नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए), अदानी विमानतळ होल्डिंग्ज (एएएचएल) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली.
यावेळी नवी मुंबई विमानतळाच्या कामाचे अपडेट या पथकाने घेतले. नवी मुंबई विमानतळाचे काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. विमानतळाचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. ५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज केला जाणार आहे. या तपासणीनंतर, विमानतळ ऑपरेटर आता विमानतळ परवान्यासाठी डीजीसीएकडे अर्ज करतील. वेळेत सर्व परवानग्या प्राप्त झाल्या तर १५ मे पासून विमानांना उड्डाण करण्याची परवानगी मिळू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, मुंबई विमानतळाचे १ टर्मिनल ऑक्टोबर २०२५ पासून पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद केले जाणार आहे. पुनर्बांधणीच्या काम सुरु असेपर्यंत येथून प्रवास करणार्या दीड कोटी प्रवाशांपैकी एक कोटी प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई विमानतळावरुन केली जाणार आहे.