श्रीवर्धन | महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन, खारभूमी विकास व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रीपद घेतल्यानंतर प्रथमच श्रीवर्धनचा दौरा केला. यावेळी श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांजवळ संवाद साधताना पालकमंत्री पदाबाबत सूचक विधान केले. पालकमंत्री पदाबाबतची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून, नाशिकचा तिढा सुटलेला आहे. रायगडचादेखील लवकरच सुटेल व रायगडचा पालकमंत्री म्हणून भरत गोगावले असतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मंत्री भरत गोगावले यांचे शिवसैनिकांनी श्रीवर्धन मध्ये जल्लोषाने स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षातूनदेखील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश चव्हाण यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री गोगावले यांनी श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहामध्ये प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी जाधव, श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विराज लबडे यांच्यासोबतदेखील चर्चा केली.
यावेळी खारभूमी विकास खात्याचे अधिकार्यांना कळवूनसुद्धा ते या भेटीच्या वेळी उपस्थित नसल्याबाबत चौकशी करून माहिती देण्याचे आदेश ना.भरत गोगावले यांनी प्रांताधिकार्यांना दिले. गोगावले यांच्याकडे असलेल्या विविध खात्यांबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या खात्यामार्फत श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये कोणत्या प्रकारे कामे करता येतील? याबाबतदेखील चर्चा केली. श्रीवर्धन शहर शिवसेनेचे धनुष्यबाण असलेले भगवे झेंडे लावून भगवेमय करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृहातील कार्यक्रमानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. निषेधाच्या घोषणा देखील शिवसैनिकांनी दिल्या.