माणगाव | तालुयातील विळे-भागाड येथे घरफोडी चोरी करून २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद राजकुमार भाऊराव शंभरकर (वय- ६२) रा.एमएसएल कॉलनी विळे- भागाड, माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील अज्ञात चोरट्या इसमाने एमएसएल कॉलनी विळे-भागाड येथील रूम नं. ११२ एम २ येथे फिर्यादी राजकुमार भाऊराव शंभरकर हे राहत असलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून तोडून कपाटातील २ लाख २५ हजार रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, जुने वापरते,२२ हजार ५०० रुपये किमतीचे ५ ग्राम वजनाचे २ सोन्याचे कानातील टॉप्स, जुने वापरते, २२ हजार ५०० रुपये किमतीचे ५ ग्राम वजनाचे २ सोन्याचे कानातील टॉप्स, जुने वापरते व रोख २ हजार रुपये असा एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे.
एम २ इमारतीमधील रूम नं. १०६ मधील मालक नित्यानंद अखिलेश मिश्रा, एम १ इमारतीमधील रूम नं. १ मधील डिस्पेंसरी रूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असून रूम नं. १०३ मधील रूम मालक कर्णाटी नरसामाराव, रूम नं. १०९ मधील रूम मालक अंजनीराम पांडे, रूम नं.१११ रूम मालक राहुल श्रीकृष्ण राव भरोसे तसेच एमएच ०३ मधील रूम नं. १०५ च्या रूमचे देखील कडी कोयंडा तोडून घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्या इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा रजि. नं.४७/ २०२५ भा.न्या. संहित कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.