कनकेश्वर दर्शनासाठीचा मार्ग आता सुलभ होणार , रोप वेच्या कामाला मंत्रिमंडळाची मान्यता

28 Feb 2025 13:22:57
 alibag

अलिबाग |
अलिबागजवळच्या श्रीक्षेत्र कनकेश्वर देवस्थानच्या दर्शनाला जाण्यासाठीचा मार्ग लवकरच सोपा होणार आहे. राज्यातील एकूण ४५ देवस्थानांवर जाण्यासाठी रोप-वे उभारण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर आणि अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला या मार्गांचाही समावेश आहे.
 
केंद्राच्या राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेंतर्गत रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. अलिबागकरांसह संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या मापगाव येथील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे जाण्यासाठी सुमारे ३०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वृद्ध भक्तांना दर्शनासाठी जाता येत नाही. तरूणमंडळीदेखील पायरी मार्गाने जाणे टाळतात.
 
त्यामुळेच या ठिकाणी रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक गणपतीचे मंदिर म्हणजे गणेश पंचायतन हे अलिबागकरांचे आराध्य दैवत मानले जाते; मात्र हे मंदिर अरबी समुद्रात असणार्‍या कुलाबा किल्ल्यात स्थित आहे. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ज्या वेळी ओहोटी असेल त्याचवेळी जाता येते. इतर वेळी किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक कोळीबांधवांच्या बोटी उपलब्ध असतात; मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही.
 
त्यामुळे किनार्‍यापासून किल्ल्यात जाण्यासाठी रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.कनकेश्वर येथील रोप-वेची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची तर समुद्रकिनार्‍यावरील रोप-वेची जबाबदारी अलिबाग नगर परिषदेची आहे. रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे.
 
राज्य सरकारकडून जागा उपलब्ध करून देणे, त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, खासगी सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील किल्ले रायगड, माथेरान, घारापुरी एलिफंटा लेणी येथेही रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
पर्यटनाचे नवे दालन खुले होणार
सरकारने दोन्ही ठिकाणी रोप वे उपलब्ध करून दिल्यास अलिबागमध्ये पर्यटनात वाढ होण्यास मोठी संधी आहे. अलिबागला येणारे पर्यटक समुद्र किनारी फिरणे किंवा समुद्र स्नान, वॉटरस्पोर्टसचा आनंद घेतात. परंतु रोप वेची सुविधा झाल्यास मराठा आरमाराचे मुख्यालय असलेल्या कुलाबा किल्ल्यावर पर्यटकांना सहजपणे जाता येणार आहे.
 
सध्या पर्यटक दुरूनच या किल्ल्याचे दर्शन घेतात. मापगावच्या डोंगरावर असलेले श्रीक्षेत्र कनकेश्वर हे ठिकाण पर्यटकांसाठी अपरीचित आहे. परंतु रोप वे सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटनाचे नवे दालन खुले होणार आहे.
कनकेश्वर रोप-वेचा प्रस्ताव
कनकेश्वर रोप-वेचा प्रस्ताव खूप आधीच पाठवला आहे. वर्षभर देवस्थानाला भेट देणार्‍यांची संख्या मोठी आहे; परंतु तेथे पोहोचणे वयोवृद्ध, लहान मुलांना शक्य होत नाही. रोप-वेमुळे भाविकांना दिलासा मिळेल. असाच प्रस्ताव कुलाबा किल्ल्याचाही असेल - आ. महेंद्र दळवी
Powered By Sangraha 9.0