पनवेल | दुचाकीस्वाराने दुसर्या गाडीच्या पुढे जात असताना कट मारल्याच्या कारणावरुन त्या दुचाकीस्वाराला जबर मारहाण करून त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना खारघरमध्ये घडली. याप्रकरणी दोघांविरोधामध्ये खारघर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरुन थेट खून करण्यापर्यंत संबंधिताची मजल गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
या मारेकर्यांचा नवी मुंबई पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल, असे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बेलपाडा ते उत्सव या रस्त्यावरून शिवकुमार रोशनलाल शर्मा (वय ४५, रा. वाशी) हे दुचाकीवरून चालले होते.
उत्सव चौकाच्या अलिकडे शंभर मीटरवर ओव्हरटेक करत, गाडीला कट मारला म्हणून दुसर्या दुचाकीस्वाराने शर्मा यांच्याबरोबर वाद घातला. त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. दोघा अज्ञात मारेकर्यांनी शिवकुमार यांना हेल्मेटने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे शिवकुमार यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलीस अंमलदार विनय तळभंडारे यांनी खारघर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मारेकरी हे अंदाजे २२ ते २५ वर्षाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.