हेटवणे-शहापालाडा जोडणार्‍या कालव्याचे लाखो लिटर पाणी वाया

07 Feb 2025 13:03:15
pen
 
पेण | पेण तालुयातील हेटवणे आणि शहापाडा धरणांना जोडणार्‍या मातीच्या कालव्यातील पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये झिरपल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 
हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणामध्ये उचलून ते पाणी पेण तालुयातील खारेपाट भागतील नागरिकांना पिण्यासाठी पोहचविण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी दोन धरणांना जोडणार्‍या कालव्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
 
मात्र हे पाणी कालव्याद्वारे सोडले जरी असले तरी ते पाणी सदर कालवा लीकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी तर वाया जात आहेच शिवाय कालव्या लगत असणारी शेती, फार्म हाऊस, छोटे मोठे उद्योजक यांच्यामधे पाणी शिरून या नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
एकीकडे खारेपाट भागातील जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने ही कालव्याद्वारे पाणी पोहोच करण्याची योजना राबविण्याचे शासनाने ठरविले असले तरी या खारेपाट भागात काही आजतागायत हवे तसे पाणी पोहोचले नाही आणि दुसरीकडे हेच पाणी कालव्याद्वारे शहापाडा धरणात सोडत असताना लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने संबंधीत यंत्रणा या योजनेबाबत पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे संतप्त शेतकरी, स्थानिक नागरीक आणि खारेपाट भागातील नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वीच हेटवणे धरणाचे पाणी कालव्याद्वारे शहापाडा धरणात सोडण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे पाणी कालव्याच्या बाहेर झिरपत असल्याने आम्ही पाईप लाईनद्वारे हे पाणी सोडण्याचा विचार करणार आहोत. आणि त्या पद्धतीची टेंडर प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होऊन हे पाईप लाईनचे काम देखील लवकरच पूर्णत्वास येईल. - दिपाली राजभोज, जलसंपदा विभाग
Powered By Sangraha 9.0