कोलाड | मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरुन कोलाड हायस्कूल कोलाड कडे जाणार्या रस्त्याचे तीनतेरा वाजले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसह, रहिवाशी नागरिक तसेच प्रवाशी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गांवर प्राथमिक मराठी केंद्र शाळा, द.ग.तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, रहिवासी वस्ती तसेच मधून जवळचा मार्ग असल्यामुळे धाटाव एम.आय.डी.सी.मध्ये कामावर जाणारे असंख्य गावातील कामगार याच मार्गाने ये जा करीत असतात गेली दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यातून मार्ग काढतांना प्रवासीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून खड्डे दिसत नाही यामुळे या मार्गांवर अपघात होतांना दिसत आहेत गेल्या पावसाळ्यात या मार्गानी जाणारे शालेय विद्यार्थी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे टु-व्हीलर स्लीप होऊन खाली पडले; परंतु सुदैवाने ते थोडयात बचावले. गाव तेथे चांगला रस्ता, हे शासनाचे ब्रीदवाय कागदावर राहिले असल्याचे दिसून येत आहे. परंतु या मार्गानी प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक, रहिवासी, नागरिक, कामगार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम पूर्ण होईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.