अलिबागमध्ये आजपासून रंगणार संगीत महोत्सव

08 Feb 2025 18:05:46
 alibag
 
अलिबाग | अलिबाग या संस्थेतर्फे येथील आरसीएफ वसाहतीमध्ये ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विख्यात वहाणे भगिनी यांची सतार-संतूर जुगलबंदी, युवा गायिका कस्तुरी देशपांडे-मांजरेकर हीचे शास्त्रीय गायन आणि अभिजित पोहनकर यांचा लोकप्रिय बॉलीवुड घराना हा फ्यूजन कार्यक्रमाची मेजवानी आहे. मैफिल, अलिबाग ही संस्था आरसीएफच्या सहयोगाने गेली पस्तीस वर्षे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करीत आहे.
 
आजवर उस्ताद झाकीर हुसैन, पं. शिवकुमार शर्मा, पं.हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद शहीद परवेझ, पं.उल्हास कशाळकर, उस्ताद डागर बंधू, पं वेंकटेश कुमार, विदुषी प्रभा अत्रे, अश्विनी भिडे यांसारख्या जगदविख्यात बुजुर्ग कलाकारांसह अनेक युवा व स्थानिक कलाकारांचे अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आजपासून सुरु होत असलेल्या महोत्सवात पहिल्या दिवशी प्रतिभाशाली उदयोन्मुख गायिका कस्तुरी देशपांडे यांचे सादरीकरण होणार आहे.
 
मूळची अलिबागचीच असलेल्या कस्तुरी देशपांडे सध्या पं.बबनराव हळदणकर यांच्याकडे कस्तुरी तालीम घेत आहे. भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्तीही कस्तुरीला मिळाली आहे. दुसरा कार्यक्रम वाहने सिस्टर्स नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रकृती आणि संस्कृती या दोन्ही बहिणी शृतिशील उद्धव यांच्या तबलासाथीने सतार संतूर जुगलबंदी सादर करणार आहेत. रविवारी संध्याकाळी अभिजित पोहनकर प्रस्तुत लोकप्रिय कार्यक्रम बॉलिवूड घराना हा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
भारतीय शास्त्रीय संगीत आणि बॉलिवूड गाण्यांचा अनोखा संगम सादर करतो. या कार्यक्रमात अभिजीत पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि बॉलिवूडच्या हिट गाण्यांना एकत्रित करून एक नवीन ध्वनी निर्माण केला आहे. उदाहरणार्थ, ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणे आणि ‘धोलन मेंदे घर आ’ ही शास्त्रीय बंदिश यांचे मिश्रण या कार्यक्रमात सादर केले जाते.
 
अभिजीत पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील बँडमध्ये मुख्य गायिका भाव्या पंडित, शास्त्रीय गायक गंधार देशपांडे, गिटारवादक सौरभ जोशी, बास गिटारवादक राहुल देव, आणि तालवादक केयूर बारवे यांचा समावेश असणार आहे. रसिकांनी मैफिल आयोजित या सांगीतिक मेजवानीला बहुसंख्येने हजर रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ इच्छिणार्‍या संगीत रसिकांनी दीपक दुधाटे ९२८४० ७५९७१ किंवा गणेश कुलकर्णी ९९७०४ ५०५०१ यांच्याशी संपर्क साधावा.
 
 
Powered By Sangraha 9.0