माणगावात अतिक्रमणांवर सरसकट कारवाई हवी

08 Feb 2025 15:49:50
mangoan
 
माणगांव | माणगावमधील ट्रॅफिक जॅममुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. मात्र कारवाई करताना ती सरसकट होणे अपेक्षीत आहे. रस्त्यावर बसून हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांवर जशी कारवाई होते तशी ती धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांवरही झाली पाहिजे, अशी चर्चा माणगावकरांमध्ये सुरु असल्याचे दिसते आहे.
 
माणगांव शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता येथील अतिक्रमण हटविण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन प्रांताधिकारी शाम घोलप यांनी लक्ष घातले अतिक्रमण हटविले; पण पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ झाली. आता मात्र नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम सुरु केली आहे. खरे तर माणगांव ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये रुपांतरीत झाली आणि चांगले रस्ते, शुध्द पाणी पुरवठा,दिवाबत्ती, स्वच्छता-आरोग्य अनेक नागरी सोयी सुविधांना चालना मिळाली.
 
शहरातून जाणारे महामार्ग मुंबई गोवा, दिघी ते पुणे अशा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या माणगांव बाजारपेठ व बसस्थानक, रिक्षा स्टँड यामुळे वर्दळीचे वाढते प्रमाण तसेच पर्यटकांच्या गर्दीने येथील दळण-वळणावर मोठ्याप्रमाणात ताण निर्माण झाला आहे. शहरातील बांधकामे आणि टाऊन प्लॅनिंगच्या अभावाने दळणवळणास आधीपासून असणारे अरुंद रस्ते, या सर्व गोष्टींचा परिपाक सगळ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी अनुभवास येत आहे.
 
ही जटील समस्या सोडवताना कठोर भुमिका घेतल्या शिवाय पर्याय नसल्यानेच आता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. खरं तर दुसरा पर्यायच उरला नाही, आधीपासूनच अतिक्रमणविषयी दूरदृष्टी व जबाबदारपणे पारदर्शक कारवाईची आवश्यकता होती पण त्यावेळी दुर्लक्ष झाले असल्याचे आता बोलले जाते हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. माणगांवमधील वर्दळीचा अत्यंत महत्त्वपूर्णकचेरी रोड मोकळा करण्याऐवजी या ठिकाणी चुकीची गटारे, फूटपाथ तयार झाले असून याठिकाणी देखील अलिकडील गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत फेरीवाले, मच्छी विक्रेत्यांना बसण्यास मनाई नाही. या रस्त्यावर प्रांत, तहसिलदार यांची निवासस्थान आहेत. पण एकही अधिकारी या रस्त्यावर वाहतूक कोंडीविषयी भाष्य करत नाही हे मोठे आश्चर्य आहे.
 
आधी आपणच उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष करायचे, नंतर अतिक्रमण हटाव मोहीमेत कारवाई करायचीयाला म्हणावे तरी काय? सवाल ऐरणीवर आहे. एक दशकाहून अधिक काळ छोटे उद्योग चहाच्या टपर्‍या, भाजीपाला, रान भाज्या ओले काजू विकणारे आदिवासी बांधव, फ्रूटस्टॉल फेरीवाले, हातगाड्या, मच्छी विक्रेते व्यवसाय करुन आपली रोजीरोटी कमवत प्रपंच चालविताना मोठी कसरत करतात. रस्त्यावरील या व्यावसायिकांकडून नगरपंचायतदेखील पावती फाडून किरकोळ करवसुली करत एकप्रकारे त्यांना अभय देत आले आहेत. आता अचानक या लोकांना वाहतूक कोंडीचे कारणास्तव हटविण्यास कारवाई सुरु झाली.
 
आपले प्रपंच चालविताना काबाडकष्ट करुन चारपैसे कमवित जीवन जगणे मुश्किल झाले असताना अचानक अशा कारवाईचा परिणाम भोगावा लागत आहे. यासाठी प्राथमिकतेने त्यांचे पुनर्वसन करण्याची खरी गरज आहे. माणगांवमध्ये नगरपंचायतीने मच्छिमार्केट, भाजी मंडई व फेरीवाल्यांसाठी भाडेतत्त्वावर गाळे बांधून देणे आवश्यक झाले आहे. नाहीतर पुन्हा एकदा कारवाईची चर्चा आणि नंतर ‘येरे माझ्या मागल्या’ हेच अनुभवास येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0