नवीन पनवेल | आधी हत्या आणि नंतर पती हरविल्याचा बनाव रचणार्या खुनी पत्नीचे बिंग उलवे पोलिसांनी फोडले आहे. अल्पवयीन मुलगा आणि दोन मित्रांच्या मदतीने तिने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रेश्मा सचिन मोरे (वय ३५, रा. सेक्टर २३, उलवे), प्रथमेश शरद म्हात्रे (रा. अग्रोळी गाव, बेलापूर) आणि रोहित अरविंद टेमकर (रा.बेलापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सचिन मोरे असे मृताचे नाव असून, तो सोन्याच्या दागिन्यांचा कारागीर होता. २३ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई विमानतळ सर्व्हिस रोडवरुन वहाळ गावकडे येणार्या खाडीवरील पुलावर उलवे पोलिसांना एका इसमाचा मृतदेह सापडला होता. चौकशी केली असता रेश्मा मोरे नामक महिला पती हरवला असल्याची तक्रार देण्यास आली असल्याचे समजले. यावरुन सचिन मोरे यांची ओळख पटली. पत्नीकडे केलेल्या चौकशीमध्ये असमाधानकारक आणि संदिग्ध उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला.
त्यामुळे मोबाईलचे सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेज व मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालावरून सचिन मोरे यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पती सचिन मोरे हा मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याने रेश्मा मोरे हिने त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता. परंतु घटस्फोट देण्यास नकार देत असल्याने, तिने त्याच्या हत्येचा कट रचला.
रेश्मा मोरे, तिचा सोळा वर्षीय मुलगा, मित्र रोहित टेमकर आणि रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने सचिनला कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या देण्यता आल्या व सचिन मोरे नशेच्या गुंगीत असताना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा बहाणा केला. रिक्षामधून जात असताना त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे, कळंबोली, नेरुळ, उरण, जेएनपीटी आदी भागात फिरवून जासई येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षा थांबविण्यात आली आणि त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली.
त्यानंतर वाहनाखाली मृतदेह फेकून देऊन अपघात झाल्याचे दाखवावे या उद्देशाने रिक्षा चालवत घेऊन जात असताना सचिन मोरेचा श्वास सुरू असल्याचे रेश्माच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी त्याचे नाक आणि तोंड हाताने दाबून त्याची हत्या केली आणि वहाळ खाडीजवळ मृतदेह फेकून दिला. याप्रकरणी उलवे पोलिसांनी तिघांना अटक करत, त्यांची ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
तर गुन्ह्यातील मुलगा १६ वर्षांचा असल्याने त्याला बालन्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. दरम्यान, उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खरात, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल शेळके, आशुतोष देशमुख, पोलीस हवालदार तांडेल, गोसावी, पोलीस शिपाई परदेशी, घुगे, कोठुळे, रावळ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या हत्येत सहभागी असलेला रोहित टेमकर हा निलंबित पोलीस कर्मचारी आहे. २३ फेब्रुवारीला हत्या करण्यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजीदेखील सचिन मोरे याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो प्रयत्न फसला, असे तपासात समोर आले आहे.