नोकरीसाठी मुंबई, पुण्याला न जाता... तरुणांनो, गावाकडे शेती करा

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

By Raigad Times    10-Mar-2025
Total Views |
mahad
 
महाड | तरुणांनो, नोकरीसाठी मुंबई, पुण्याला न जाता गावाकडे या आणि शेती करा. शासनाकडून लागणार्‍या आवश्यक सोयी-सुविधा तुम्हाला दिल्या जातील, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी येथे केले. महाड येथील संजीवनी सामाजिक संस्थेच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी प्रसिद्ध ‘बांबू मॅन’ माजी मंत्री पाशाभाई पटेल, संस्थेच्या अध्यक्षा शीतल गोगावले, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, राजेंद्र शहाडे, मनरेगाचे सहसचिव निलेश घुगे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, बांबू तज्ञ संजीव करपे, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले की, पर्यावरणपूरक व शाश्वत विकास साधण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक शेताला पाणी व हरित महाराष्ट्र राबविणे आणि त्यामधून सुविधासंपन्न कुटुंब व समृध्द गाव करण्याकरिता शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत असून शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा.
 
आपल्याला लोकांचे स्थलांतर थांबवायचे आहे. पुणे-मुंबईपेक्षा चारपट उत्पन्न तुमच्या शेतातून मिळणार आहे. नोकर्‍या मर्यादित आहेत. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळावे. शेतकर्‍यांनी आपल्या जागा विकू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना केले. शासनाच्या असलेल्या योजनांचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरु करावे, असेही ते म्हणाले.
शेतकर्‍यांनी अधिकाधिक बांबू लागवड करावी- माजी मंत्री पाशाभाई पटेल
ऑक्सिजन तयार करण्यासाठी शेतकर्‍यांनी भातशेतीबरोबरच अधिकाधिक बांबूची लागवड करावी, असा सल्ला ‘बांबू मॅन’ माजी मंत्री पाशाभाई पटेल यांनी महाड येथे दिला. आपला शेतकरी बांबू उत्पादक होऊ शकतो आणि भविष्यात चिनला यात मागे टाकू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
ऑक्सिजनची किंमत आम्हाला कोरोनात समजली, एका व्यक्तीला आयुष्यात २८० किलो ऑक्सिजन लागतो. त्यामुळे बांधकामांपासून वीज उत्पादनापर्यंत सगळीकडे आता बांबूचा वापर होणार आहे. याकरिता शासनाकडून अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांनी भातशेतीच्या भरवशावर जगू नका, बांबूलागवड किंवा भाजीपाला करा, शेतीकडे वळा. गावागावातून जलकुंभ व शेततळे निर्माण करा असा सल्ला दिला. महाडकरांना बांबूलागवड व त्यांच्या उपयोगाविषयी माहिती देणार्‍या ऑक्सिजन रथाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी विठाबाई गोगावले, ज्योती शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांचा सत्कार करण्यात आला.