झेनिथ धबधब्याच्या डोंगरावर रायगड पोलिसांचा रॅपलिंग थरार

10 Mar 2025 19:45:07
khopoli
 
खोपोली | खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या डोंगरावर रविवारी (९ मार्च) रायगड महिला पोलिसांनी १२० फूटांच्या उंचीवर रॅपलिंगचा थरार अनुभवला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हेदेखील यामध्ये सहभागी झाले होते.
 
महिला दिनाचे औचित्य साधत झेनिथ धबधब्याच्या डोंगरावर रायगड पोलीस आणि यशवंती हायकर्स, खोपोली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रॅपलिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. पेण, अलिबाग, कर्जतसह रायगड जिल्ह्यातील ४३ महिला पोलीस सहभागी झाल्या होत्या.
 
प्रारंभी खोपोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करीत रॅपलिंगला सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेविका आर्चना पाटील यांनीही प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर सर्वच महिला पोलिसांनी हिमतीने आणि न घाबरता १२० फूट उंचीचा डोंगर उतरुन ‘आम्ही हिरकणी’ असल्याचे दाखवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय सचिव, पोलीस अधीक्षक यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी रॅपलिंगचा थरार अनुभवला.
आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलात तरबेजपणा हवा असतो. ट्रेकिंगच्या माध्यमातून हा अवजड मार्ग पार करण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल. यशवंती हायकर्स आणि रायगड पोलीस यांच्या सहकार्यातून रॅपलिंग शिबीर आयोजित करण्यात आले होते. या महिलांच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! - डॉ.श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री कार्यालय सचिव
रायगड महिला पोलिसांसाठी रॅपलिंग प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. महिला पोलिसांनी हिंमतीने आणि न घाबरता १२० फूट उंचीचा डोंगर उतरून रणरागिनी असल्याचे दाखवून दिले आहे. - सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Powered By Sangraha 9.0