कोलाड येथील भंगार गोदामाला भीषण आग; नागरिकांमध्ये घबराट

11 Mar 2025 13:03:05
 kolad
 
कोलाड | रोहा तालुक्यातील कोलाड भिरा फाट्यावरील भंगार साठा गोदामाला सोमवारी (१० मार्च) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने क्षणातच रौद्र रुप धारण केले. आगीचे...धुराचे लोळ पसरले... भिरा फाटा परिसरातील नागरिकांची या धुराने कोंडी केल्याने प्रचंड घबराट पसरली. अग्निशमन दल, विविध सामाजिक संस्था, रेस्क्यू टीम आणि स्थानिकानी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
 
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड भिरा फाटा येथे हे भंगार साठा गोदाम असून, या गोदामाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग पसरत गेल्याने या परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आग नियंत्रणासाठी रोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
 
विविध सामाजिक संस्था, मुंबई गोवा महामार्गावर काम करत असलेला कल्याण टोल कंपनीचा पाण्याचा टँकर,वजय राजिवले यांचा पाण्याचा टँकर आणि स्थानिक एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार तासांनी ही आग नियंत्रणात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भरवस्तीत भंगार गोदाम थाटण्यात आल्याने, या भंगारवाल्यांना कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 
आग नियंत्रणात आणल्याने, मोठा अनर्थ टळला असला तरी, अनेक सुरक्षेचे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. भंगाराचे साठे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी याच मार्गावरील पुई हद्दीत भंगार जाळपोळ करत असताना दुर्दैवी घटना घडली होती. ती आग नियंत्रणास आणण्यासासाठी अग्निशमन दल आणि टीमला सात ते आठ तासांहून अधिक काळ लागला होता. त्यामुळे कोलाड येथील या घटनेने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
 
 आगीवर पूर्ण नियंत्रण आले असून, या आगीचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. अशा घटनांवर ठोस उपाययोजना पुढील काळात करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - नितीन मोहिते, पोलीस निरीक्षक, कोलाड पोलीस ठाणे
Powered By Sangraha 9.0