उरण | उरण-नेरूळ लोकल मध्येच बंद पडल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल झाले. या लोकलमधून प्रवास करणार्या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरुन चालत, पर्यायी वाहन पकडून घर गाठावे लागले. याआधी जानेवारी महिन्यातदेखील अशीच लोकल बंद पडली होती. लोकल बंद पडण्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण-बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून उरणनेरू ळ उरण-बेलापूर मार्गे रेल्वे सेवा रुजू झाली. रोज हजारो प्रवासी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. प्रवाशांची गर्दी तर दिवसेंदिवस वाढतच आहे.
पण रेल्वे फेर्यांमध्ये काही वाढ होत नाही. या मार्गाबाबत अनेक समस्या आहेत. मात्र लोकल बंद पडण्याचा प्रकार अधिक गंभीर आहे. मंगळवारी (११ मार्च) सायंकाळी ५.३५ वाजता सुटणारी उरण-नेरूळ रेल्वे रेतीबंदर येथे सागरी पुलावर बंद पडली होती. त्यामुळे या मार्गावरील सेवा ठप्प झाली होती.