आज होळी | शिमग्यासाठी चाकरमानी गावाला , गावं भरल्यामुळे गावांमध्ये उत्साह; पोरं टोरं खूश

By Raigad Times    13-Mar-2025
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | रायगडात विशेषतः दक्षिण भागातून मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्या निमित्ताने गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी गावाकडे आले आहेत. त्यामुळे गावं भरली असून, एक वेगळाच उत्साह सर्वकडे पहायला मिळत आहे. आज होळी असून उद्या धुळवड साजरी करण्यात येणार आहे. होळीसाठी बुधवारी (१२ मार्च) हळकुंड सजविण्यात आले आहे. तर रात्री चोर होळी उत्सव जोरदार साजरा करण्यात आला. अनेक चाकरमानी गावागवात दाखल झाल्याने वर्दळ वाढली आहे.
 
गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गावागावात शिमगा उत्सवाच्या काळात देवदेवतांच्या पालख्या गावागावात नाचविण्यात येत आहेत. कोकणातला शिमगा उत्सव म्हणजे सुरमाडाची होळी, सजलेली ग्रामदैवतांची रुपडी, ग्रामदैवतांची पालखी, ढोल-ताशे वाद्य, नृत्य, खेळ इत्यादी असा भक्ती-मनोरंजन-खाद्य- खेळ, कौशल्यांनी भरलेला कार्यक्रम असतो. शिमगा उत्सवाची प्रत्येक गावाची निरनिराळी परंपरा, पध्दत असते.
 
विविध गावांतुन ढोलवादन स्पर्धा, पालखी नाचवण्याच्या स्पर्धा, लपवलेला प्रसाद (शेरणी) काढली जातात. पालखी नाचवण्याच्याही प्रत्येक गावाच्या निरनिराळ्या पध्दती असतात. काही गावांतुन पालखी खांद्यावर घेऊन पूर्ण गोल फिरवतात...शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात. गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात.
 
देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सान’ असे म्हणतात. यानिमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणार्‍या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.
 
नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. मात्र काळाच्या ओघात हे प्रकार मोजक्या ठिकणी सुरू आहेत.