नवीन पनवेल | गोट फार्म बांधण्यासाठी आलेल्या खर्चाची खोटी बिले दाखवून तसेच कलेटर असल्याचे भासवून दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात खांदेेशर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेक अशोक वाळंज, श्रीकांत अशोक वाळंज, चंद्रकांत केंडे अशी तिघांची नावे आहेत.
संजना रसाळ या नवीन पनवेल येथे राहत असून अभिषेक वाळंज व श्रीकांत वाळंज यांनी नागोठणे येथे गोट फार्म बकरी व्यवसाय चालू करणे बाबत कल्पना दिली. त्यानंतर जागा दाखवली आणि चंद्रकांत केंडे हे रायगडचे कलेटर असल्याची ओळख करून दिली. ते कलेटर असल्याने गोट फार्म बनवण्यासाठी लागणारे साहित्य स्वस्त दरात मिळाल्याचे आणि ते व्यवसायात भागीदार असल्याचे सांगितले.
त्यानुसार त्यांनी ९ लाख रुपये चेक व ऑनलाइन दोघांच्या बँक खात्यात जमा केले. त्यांच्या पतीने देखील दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. यावेळी त्यांनी सहा महिने भागीदार म्हणून काम केले. मात्र भागीदाराचा फायदा दिलेला नाही. त्यानंतर गोट फार्मसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब मागितला असता एक लाख रुपये रसाळ यांच्या खात्यात जमा केले. हिशोबाच्या पावत्या दाखवल्या नाहीत. ११ लाखापैकी एक लाख रुपये परत दिले. मात्र दहा लाख रुपये दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.