पेण | होळी, धूलिवंदन, ईद, रंगपंचमी आदी सणांदरम्यान पेण तालुयातील नागरिकांनी सण उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये किंवा कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिल्या होत्या. अनेक नागरिकांनी आपला सण उत्सव उत्साहात पार पाडला.
तरीही होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी नाकाबंदी दरम्यान पेण पोलिसांकडून सहा हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून ३२ वाहनांवर कारवाई देखील करण्यात आलीआहे. होळी आणि धूलिवंदन सण साजरा करताना पेण पोलिसांनी नाकाबंदी करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्या ३२वाहनांवर कार्यवाही केली असून त्यांच्याकडून ३० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच ड्रक अॅन्ड ड्राईव्हची एक केस देखील करण्यात आली आहे. पेण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२५ एन.डी. पी.एस.चे ८ ( क ) २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये परशुराम म्हात्रे यांच्याकडून ३३१.१८ ग्रॅम वजनाचा गांजा मादक व नशाकारक पदार्थ असे एकूण सहा हजार रुपये किमतीचा गांजा देखील हस्तगत करण्यात पेण पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश रजपूत हे करीत आहेत. दरम्यान होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी काही प्रमाणात केसेस करण्याची वेळ आमच्यावर आली असली तरी यापुढे येणार्या सण उत्सवांना तरी पेणमधील नागरिकांनी आणि विशेष करून तरुणांनी नियमांचे उल्लंघन न करता आपला आनंद व्यक्त करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.