कोकण किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करणार-मुख्यमंत्री

20 Mar 2025 16:20:36
 mumbai
 
मुंबई | कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण हा ५ हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी बाह्यस्त्रोत बँकांकडून निधी उपलब्ध होत आहे. याअंतर्गत कोकण किनारपट्टीतील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य राजन नाईक यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
 
यावेळी सदस्य योगेश सागर, राजेंद्र गावित यांनीही उपप्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वसई मंडळात सुधारित वितरण क्षेत्र योजना (आर. डी. एस.एस.) अंतर्गत २७ किमी विद्युत वाहिन्या भूमीगत करण्यात येत असून त्यापैकी ९.५७ कि.मी. किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
 
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने वसई मंडळांतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी २११.५५ कोटींच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून दोन वर्षांमध्ये काम पूर्ण करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत डक्ट असेल तिथे ओव्हरहेड वायरला परवानगी न देण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. अशा ठिकाणी ओव्हरहेड वायर असतील तर त्या जप्त केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0