म्हसळा | मित्राची हत्या करुन मृतदेह गोणीमध्ये भरुन रायगडमधील म्हसळा येथे फेकून देणार्या तिघांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. मृताच्या खिशात सापडलेल्याडायरीतील एका नंबरवरुन ही कामगिरी पोलिसांनी केली. होळीत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
पांगळोली बंडवाडी येथे एका पोत्यात मृतदेह असल्याचा फोन सोमवारी म्हसळा पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोत्याची तपासणी केली असता या पोत्यात एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. उमेश पासवान उर्फ बादशाह (वय ४०, रा. नालासोपारा) असे या मृताचे नाव आहे. म्हसळा पोलिसांना या मृताच्या खिशात एक डायरी आढळून आली.
या डायरीमध्ये एकच नंबर लिहिलेला होता... त्या नंबरवर पोलिसांनी फोन केला असता, तो श्रीवर्धन तालुक्यातील कोंडेपंचतन येथे राहणार्या संतोष साबळे याचा असल्याचे आढळून आले. संतोष हा छोटी मोठी रस्त्याची कामे घेत असून लेबर पुरविण्याचे काम करतो.
पोलिसांनी साबळेला चौकशीसाठी बोलावले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दुसर्या बाजूला म्हसळा पोलिसांनी आपली सूत्रे हलवत मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील साबळेच्या साईटवरून दोन कामगारांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत होळीच्या वादात हा खून केल्याचा म्हटले आहे. उमेश पासवान याची हत्या केल्यानंतर याची माहिती मालक साबळे याला दिली.
मात्र साबळे याने पोलिसांना माहिती देण्याचे टाळलेच; परंतू मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकण्यास सांगितले. याप्रकरणी संतोष साबळे (रा. कोंडेपंचतन), विशाल देवरुखकर (रा. गुहागर), श्यामलाल मौर्य (रा.उत्तर प्रदेश) या तिघांच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी विभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, सहाय्यकपोलीस निरीक्षक संदीप काहाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, संतोष चव्हाण, सागर चितारे, विघ्ने, स्वप्नील निळेकर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली.