महाड | ऐतिहासिक शहर महाडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
गुरुवारी (२० मार्च) महाड येथे समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणार्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्यावतीने रायगड पोलीस दलाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली. तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. चवदार तळे सुशोभिकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या ७ कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले. चवदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.