रोह्यातील अपघातग्रस्त अमोल मोरेचा मृत्यू , मृत्यूशी झुंज ठरली अपयशी!

By Raigad Times    22-Mar-2025
Total Views |
 roha
 
धाटाव | रोहा अष्टमी नगरपरिषदेजवळील रस्त्यावरुन जाताना मोटारसायकल दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रोहा भुवनेश्वर येथील अमोल मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अमोलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गुरुवारी (२० मार्च) उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
 
त्याच्या अशाप्रकारे जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोह्यातील भुवनेश्वर येथे राहणारा अमोल मोरे त्याच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरुन प्रवास करत असताना रोहा अष्टमी नगरपरिषदेजवळील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर तो आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चक्कर आली होती.
 
तो जागच्या जागीच निपचीत पडला होता. त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव होत असल्याने जमलेल्या जमावाने त्याला रिक्षातून दवाखान्यात नेले होते. प्राथमिक उपचारानंतर अमोलला अधिक उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले. गेले अनेक दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरु असताना गुरुवारी २० मार्च रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. अमोल होतकरू मेकॅनिक व उत्तम ड्रायव्हर असतानासुद्धा पार्किंग, अरुंद रस्ता व नियोजनाचा अभाव यामुळे या तरुणाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, रोहा शहरात अपूर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मध्येच काही ठिकाणी दुभाजक तसेच दुभाजकासाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत.अरुंद रस्ते, पार्किंग व्यवस्था, ठेकेदार व प्रशासन या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने लवकरच रस्ता व पार्किंग व्यवस्था प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.