माणगावातील तीन बत्ती नाक्यावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    22-Mar-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. माणगाव शहरातील तीन बत्ती नाक्यावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, माणगावमध्ये मुंबई-गोवा हायवेवर जुने माणगाव येथील तीन बत्ती नाका येथे दि. २० मार्च रोजी सकाळी ११.१५ च्या दरम्यान महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्रं. आरजे १९ जी जी ०५७० ह्या कंटेनरच्या मागच्या टायरखाली येऊन जुने माणगाव येथील राहणारा मोहम्मद रफी इस्माईल जामदार (वय ३९) हा तरुण आपल्या ताब्यातील हिरो होंडा फॅशन प्लस क्रं. एमएच ०५ वाय ४४८२ घेऊन जात असताना तीन बत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील टायरखाली येऊन चिरडून मोहम्मद रफी इस्माईल जामदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
मोहम्मद रफी इस्माईल जामदार हा जुने माणगाव येथील रहिवासी असून व्यवसायाने इलेट्रिशन प्लबिंग, एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. तसेच जामदार हा आपदा मित्र म्हणून माणगावमध्ये साळुंखे रेस्यू टीममध्ये देखील कार्यरत होता. मोहम्मद रफी इस्माईल जामदारच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. माणगावमध्ये सततची वाहतूक कोंडी असते. माणगाव बायपासचे काम रखडले आहे.
 
होळी सणासाठी कोकणात चाकरमानी येत असतात. माणगाव शहरात होळी सणापासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवित असल्याने वाहतूक कोंडी अधिक भर पडते. या अपघातानंतर संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत मुंबई-गोवा महामार्ग रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी माणगाव पोलीस ठाणे टीम, माणगाव वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.