श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी सेल्फीच्या नादात एका महिला पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातून पर्यटनासाठी नऊ महिला श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे आल्या होत्या.
हरिहरेश्वर येथील एमटीडीसी येथे वस्ती करुन रविवारी (२३ मार्च) सकाळी हरिहरेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर समुद्रकिनारी शुक्ल तिर्थ भुई खोंडी परिसरात फेरफटका मारण्यासाठी त्या गेल्या होता. यावेळी समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती लागली होती.
अशावेळी उत्साहाच्या नादात सेल्फी काढण्यासाठी पाण्याजवळ जात असलेल्या काही महिलांना स्थानिक नागरिकांनी पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पल्लवी राहुल सरोदे (वय ३७, रा.ठाणे पाचपाखाडी) यांनी स्थानिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि समुद्र किनारी पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या आलेल्या मोठ्या लाटेबरोबर पल्लवी सरोदे वाहून गेल्या.
यावेळी स्थानिक बचाव पथकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या बचावल्या नाहीत. पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अशा घटना यापूर्वीदेखील हरिहरेश्वर समुद्रकिनारी घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून उसळत्या लाटेजवळ न जाण्याचे फलक ग्रामपंचायतीने लावले आहेत. असे असताना काही अतिउत्साही पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.