म्हसळा | म्हसळा सकलप फाटा येथे ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणार्या आयवा डंपरचा अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२४ मार्च) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीवर्धन हरिहरेश्वर हद्दीतून रोज हजारो टन मायनींग (मिश्रीत माती) ट्रक ट्रेला, आयवा डंपरने श्रीवर्धन, म्हसळा राज्य मार्गाने आणि दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणारा आयवा डंपर श्रीवर्धन कडून म्हसळा मार्गे सकलप गावच्या हद्दीतील दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील सकलप फाटा येथे तीव्र उतार उतरत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि डंपर समोरील डोंगराला धडकला.
ही धडक इतकी जबरदस्त होती या अपघातात डंपरचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. यात चालक नसिमुद्दिन जमरुद्दिन अन्सारी (वय ३५, रा.नवदानगर,बिलूनगड,हजारीबाग झारखंड) याचा गाडीत अडकून जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त डंपर हा श्रीवर्धन येथील रमेश मोहिते यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिनकर, पोलीस कॉन्स्टेबल पालोदे आदी पोलीस कर्मचारी आणि शेकडो स्वयंसेवी नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य केले. अपघात झालेल्या गाडीत अडकून पडलेल्या डंपर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीचे सहाय्याने तब्बल एक तास प्रयत्न करावे लागले. या कामी पोलिसांना म्हसळा स्वयंसेवी नागरिकांनी मदत केली.